151
कर्मचारी हिताला प्राधान्य; पिंपरी-चिंचवड महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाच वर्षांचा ऐतिहासिक बोनस व सानुग्रह अनुदान करार संपन्न!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २८ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: महानगरपालिकेतील वर्ग १ ते ४ मधील हजारो अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी पिंपरी-चिंचवडचे प्रथम नागरिक तथा महापौर रवी लांडगे यांनी एक अत्यंत कौतुकास्पद व ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन २०२५-२६ ते २०२९-३० या पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी ८.३३% बोनस आणि ₹३०,००० सानुग्रह अनुदान देण्याच्या महत्त्वपूर्ण करारनाम्यावर महापालिका प्रशासन आणि महापालिका कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.
महापौर रवी लांडगे यांनी दाखवलेली सकारात्मक व संवेदनशील भूमिका आणि कर्मचाऱ्यांच्या हिताला दिलेले सर्वोच्च प्राधान्य यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून सर्वस्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासात आणि महापालिकेच्या दैनिक कामकाजात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. कर्मचाऱ्यांचा हक्क त्यांना वेळेत व सन्मानाने मिळाला पाहिजे, हीच भूमिका सुरुवातीपासून महापौर रवी लांडगे यांनी घेतली. एकाच वेळी तब्बल पाच वर्षांसाठी सानुग्रह अनुदान आणि बोनसचा करार पूर्ण करून त्यांनी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी ही सकारात्मक भूमिका भविष्यातही अशीच कायम राहील, असा विश्वास महापौर लांडगे यांनी व्यक्त केला.

या ऐतिहासिक करारनाम्यावर स्वाक्षरी करताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे, मंगेश कलापुरे, अण्णासाहेब वाघोले, दत्तात्रय ढगे, विशाल बाणेकर, सनी कदम, पै. अभिषेक फुगे यांसह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाच वर्षांच्या प्रदीर्घ करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे महापालिकेच्या वर्ग १ ते ४ मधील कर्मचाऱ्यांचे भवितव्य निश्चित झाले असून सणासुदीच्या काळात मोठा आर्थिक हातभार लागणार आहे. कामगार हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे लोकप्रतिनिधी म्हणून महापौर रवी लांडगे यांची प्रतिमा कामगार वर्गात अधिक उंचावली असून, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ व कर्मचाऱ्यांच्या वतीने महापौर रवी लांडगे यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
