10
पौड तहसीलदार कार्यालयात शासकीय कामात अडथळा अन् सोशल मीडियावर अश्लील पोस्ट; मुख्य आरोपी विशाल गायकवाड व प्रतीक वाघमारे यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी , दि. २८ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पौड / पिंपरी: मुळशी तालुक्यातील पौड येथील तहसील कार्यालयात घुसून शासकीय कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करणे, कागदपत्रे हिसकावून फेकून देणे, तसेच तहसीलदारांच्या केबिनमध्ये उद्धट वर्तन करून सोशल मीडियावर अश्लील व अवमानकारक भाषेत व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी मुख्य आरोपी विशाल उर्फ साकी गायकवाड व प्रतीक वाघमारे यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, सध्या फरारी असलेल्या साकी गायकवाडचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी साकी उर्फ विशाल गायकवाड हा एक सराईत गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस असून मागील दोन वर्षे त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. नुकतीच त्याची तडीपारीची मुदत संपल्याने तो स्वघरी परतला होता. मात्र, जिल्ह्यात परतताच त्याने पुन्हा एकदा कायदा हातात घेऊन थेट शासकीय कार्यालयात घुसून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा सराईत आणि गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर कडक कायदेशीर बडगा उगारून आळा घालणे ही आता काळाची गरज बनली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
पौड तहसील कार्यालयात महसूल सहायक म्हणून कार्यरत असलेले प्रदीप रामभाऊ सोनटक्के यांनी या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. पहिला प्रकार (दि. १२ ऑगस्ट २०२६) दुपारी २ वाजेच्या सुमारास प्रतीक जितेंद्र वाघमारे आणि विशाल उर्फ साकी गायकवाड तहसील कार्यालयात आले. मारुंजी रोड ताथवडे येथील एका प्रकल्पाच्या उत्खननाबाबत माहिती अधिकारांतर्गत घेतलेल्या माहितीवरून त्यांनी वाद घातला. कर्मचाऱ्याने वेळेत माहिती दिल्याचे सांगितल्यानंतरही आरोपींनी कागदपत्रे हिसकावून घेतली, विनापरवानगी व्हिडिओ शूटिंग केले आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. आरोपींनी थेट तहसीलदार पौड मुळशी यांच्या केबिनमध्ये घुसून त्यांच्याशी एकेरी भाषेत उद्धट वर्तन केले. आरोपी साकी गायकवाड याने त्याच्या ‘saki gaikwad’ नावाच्या फेसबुक अकाउंटवरून हा व्हिडिओ व्हायरल केला आणि कॅप्शनमध्ये शासकीय यंत्रणेबद्दल अत्यंत खालच्या पातळीची व अश्लील भाषा वापरून अधिकाऱ्यांची बदनामी केली. दुसरी घटना (दि. २१ ऑगस्ट २०२६) पुन्हा २१ ऑगस्ट रोजी प्रतीक वाघमारे, विशाल उर्फ साकी गायकवाड व त्यांच्या एका अन्य अज्ञात सहकाऱ्याने निवासी नायब तहसीलदार यांच्या कार्यालयात जाऊन पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
सरकारी कामात अडथळा आणणे, लोकसेवकांना धमकी देणे आणि इलेक्टॉनिक माध्यमांचा गैरवापर करून बदनामी केल्याप्रकरणी पौड पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ ची कलम १३२, २२१, २९६, ३(५), ३५१(२) आणि ३५६ अन्वये कठोर गुन्हे दाखल केले आहेत.
पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष दत्तात्रय गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनेनंतर फरारी झालेल्या विशाल गायकवाडचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये दहशत पसरवणाऱ्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा देण्यात आला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
