15
नृत्य कलेतून कलाकारांना परमानंदाची अनुभूती — वरदा वैशंपायन; ‘नृत्योपासना’च्या स्नेहसंमेलनात लहानग्या रेवा कुंभारच्या ओडिसी नृत्याने वेधले प्रेक्षकांचे लक्ष!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २८ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड : “भारतीय अभिजात नृत्यकला व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात मोलाची भर घालते. नृत्यकलेच्या माध्यमातून कलाकारांना परमानंदाची अनुभूती मिळते. यामुळे मनाची एकाग्रता वाढून शारीरिक व मानसिक क्षमतांचा विकास होतो. नृत्यकलांमध्ये आपली संस्कृती जपण्याची आणि संवर्धित करण्याची मोठी क्षमता असून, त्यातून संस्कारक्षम तरुण पिढी निर्माण होते,” असे प्रतिपादन ‘नृत्योपासना भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्यालय’च्या संस्थापक वरदा वैशंपायन यांनी केले.
‘नृत्योपासना भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्यालय’चे वार्षिक स्नेहसंमेलन पिंपरी येथे मोठ्या उत्साहात व सांस्कृतिक वातावरणात पार पडले. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
या सोहळ्यात ओडिसी आणि भरतनाट्यमचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट नृत्याविष्कार सादर केला. गुरु वरदा वैशंपायन यांनी आपल्या सर्वात कमी वयाची शिष्या रेवा कुंभार हिच्यासह आर्णा गुरु, हंसिनी रमेश, हर्षिता बिस्वाल आणि योगिता भसीन यांच्या समवेत ओडिसी नृत्य सादर केले.
ओडिसी नृत्य शिकणाऱ्या मुलींमध्ये रेवा ही वयाने सर्वात लहान विद्यार्थिनी असून, इतक्या लहान वयात कठीण मानल्या जाणाऱ्या ओडिसी नृत्याचे धडे गिरवत तिने रंगमंचावर अत्यंत आत्मविश्वासाने आणि बहारदारपणे नृत्य सादर केले. तिच्या या कौतुकास्पद सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
स्नेहसंमेलनात ओडिसी नृत्यांतर्गत चौक आणि त्रिभंगी पदन्यास, बटू यांसारख्या पारंपरिक नृत्य रचना सादर करण्यात आल्या. तर दुसरीकडे भरतनाट्यम शिकणाऱ्या ४० हून अधिक विद्यार्थिनींनी मल्लरी, पुष्पांजली, अलारिपु, जतीस्वरम, शब्दम्, कीर्तनम, अंबाष्टक, जावळी, “जरा इतना बता दे कान्हा” हे कृष्ण भजन, बारा ज्योतिर्लिंग श्लोकम, तिल्लाना आणि अभंग यांसारख्या विविध नृत्य रचना सादर करून प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली.
या सांस्कृतिक कार्यक्रमास ज्येष्ठ निरुपणकार रविंद्रजी पाठक आणि स्नेहल सोमण यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय नृत्यालयाच्या सर्व विद्यार्थिनी, त्यांचे पालक आणि परिसरातील रसिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सर्व बालकलाकारांचे आणि गुरु वरदा वैशंपायन यांच्या मार्गदर्शनाचे मनःपूर्वक कौतुक केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

