30
मुख्यमंत्र्यांना राखी बांधून लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची मागणी; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची तातडीने नियुक्ती करण्याची दुर्गा भोर यांची जोरदार मागणी!
मुंबई/पिंपरी प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २८ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / मुंबई: रक्षाबंधनाचे औचित्य साधून दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना राखी बांधली. या प्रसंगी राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणत, गेल्या सात महिन्यांपासून रिक्त असलेल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी तातडीने सक्षम नेतृत्वाची नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कुमारी दुर्गा भोर यांनी केली.
यावेळी बोलताना दुर्गा ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा कुमारी दुर्गा भोर म्हणाल्या, “राज्य सरकारने महिलांना ‘लाडकी बहीण’ म्हणून सन्मान दिला आहे. मात्र, केवळ आर्थिक मदत देऊन भागणार नाही, तर प्रत्येक लाडक्या बहिणीला सुरक्षेची ठोस आणि प्रत्यक्ष हमी मिळणे आवश्यक आहे. राज्यात महिलांवरील अत्याचार, हुंड्यासाठी छळ, कौटुंबिक हिंसाचार आणि संशयास्पद मृत्यूंच्या घटनांमध्ये वाढ होत असताना महिला आयोगासारखी सर्वोच्च संस्था बिनअध्यक्षांची असणे चिंताजनक आहे.”
कोणताही राजकीय विलंब न करता महिला आयोगाच्या अध्यक्षांची तातडीने नियुक्ती करून संपूर्ण आयोग यंत्रणा सक्रिय करावी, तसेच ‘शक्ती कायदा’ त्वरित अमलात आणावा, अशी मागणीही त्यांनी या वेळी लावून धरली.

वाकड येथील शिल्पा गवारे यांच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेचा या वेळी दुर्गा ब्रिगेडच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. माहेरच्या मालमत्तेतील हिस्सा आणि पैशांच्या हव्यासापोटी त्यांचा मानसिक व शारीरिक छळ झाल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणाचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली निष्पक्ष व सखोल तपास करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी शासनाने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.
दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या माध्यमातून कुमारी दुर्गा भोर या अत्यंत अल्प वयात महिलांच्या न्याय-हक्कांसाठी आणि सक्षमीकरणासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. वर्षभरात महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम, समुपदेशन व जनजागृती योजना यशस्वीपणे राबवून त्यांनी जनसामान्यांमध्ये आणि विशेषतः महिला वर्गात एक कणखर, संवेदनशील व आदरणीय समाजसेविका म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. “राखी हे केवळ नात्याचे धागे नसून संरक्षणाच्या वचनाचे प्रतीक आहे; त्यामुळे महिला सुरक्षेबाबत केवळ घोषणा नकोत तर प्रत्यक्ष कारवाई हवी,” असा ठाम विश्वास त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला.
या प्रसंगी मुख्यमंत्री महोदयांना राखी बांधताना दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या कुमारी दुर्गा भोर (राष्ट्रीय अध्यक्षा), कुमारी अवंतिका भोर (युवती अध्यक्षा), गार्गी डोके (युवती पदाधिकारी), कुमारी दिपाली चव्हाण (युवती उपाध्यक्ष), कुमारी पायल मानकर (युवती संघटक), कुमारी वैष्णवी देवकते (पदाधिकारी), कुमारी नेहा शिंगोटे (पदाधिकारी), जयश्री साळुंखे (पदाधिकारी), रईसा पठाण (पदाधिकारी), रूपा सोनार (पदाधिकारी), कु. मोहसीना शेख (पदाधिकारी) यांच्यासह पक्षाच्या अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
