53
‘मॅक्स मंथन बातमीचा इंपॅक्ट!’ रहाटणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील धोकादायक खड्ड्याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ३० ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
रहाटणी / पिंपरी: रहाटणी येथील अत्यंत वर्दळीच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात पडलेल्या मोठ्या आणि धोकादायक खड्ड्याबाबत ‘मॅक्स मंथन डेली न्यूज’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची महापालिका प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. पिंपरी-चिंचवड शहराला खड्डेमुक्त करण्याचा संकल्प महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केला असताना, रहाटणी-पिंपळे सौदागरच्या मुख्य चौकातील या जीवघेण्या समस्येकडे ‘मॅक्स मंथन डेली न्यूज’ने लक्ष वेधले होते. बातमी प्रसिद्ध होताच महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून खड्ड्याची दुरुस्ती करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
रहाटणी आणि पिंपळे सौदागर जोडणाऱ्या या मुख्य चौकात पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना खड्ड्याचा अंदाज न आल्याने अचानक ब्रेक लावावे लागत होते, ज्यामुळे भीषण अपघाताची टांगती तलवार निर्माण झाली होती.
या गंभीर समस्येवर सामाजिक कार्यकर्ते अरुण चाबुकस्वार यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले होते. नागरिकांच्या सुरक्षेचा हा प्रश्न ‘मॅक्स मंथन डेली न्यूज’ने प्राधान्याने लावून धरत प्रशासकीय बेफिकिरीवर प्रकाश टाकला होता.
बातमी प्रसिद्ध होताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संबंधित अभियांत्रिकी व रस्ते बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा धोकादायक खड्डा तातडीने बुजवून रस्ता सुस्थितीत करण्याच्या कामाला प्रशासनाने सुरुवात केली आहे.
“स्मार्ट सिटी परिसरात पडलेला हा खड्डा नागरिकांच्या जीवावर बेतणारा होता. ‘मॅक्स मंथन डेली न्यूज’ने नागरिकांच्या या ज्वलंत समस्येला वाचा फोडली आणि प्रशासनाला जागे केले. वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाने दुरुस्तीचे पाऊल उचलल्याबद्दल ‘मॅक्स मंथन न्यूज’चे मनःपूर्वक आभार.”— अरुण चाबुकस्वार (सामाजिक कार्यकर्ते)
प्रशासनाने तातडीने दखल घेतल्यामुळे रहाटणी व पिंपळे सौदागर परिसरातील वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. जनसामान्यांच्या समस्यांना प्रशासकीय दरबारी मांडून त्या तात्काळ सोडवून दिल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी ‘मॅक्स मंथन डेली न्यूज’च्या प्रतिनिधींचे आभार मानले आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
