67
जिद्द अन् संघर्षावर मात! पिंपरी-चिंचवड मनपा मोरवाडी आयटीआयच्या असिफ मुलानीची सौदी अरेबिया येथे ‘ज्युनियर डिझायनर’पदी निवड!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ३० ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर हलाखीच्या परिस्थितीवर मात करत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) माजी विद्यार्थ्याने गगनभरारी घेतली आहे. सन २०२१-२३ सत्रातील ‘ड्राफ्ट्समन मेकॅनिकल’ या ट्रेडचा प्रशिक्षणार्थी असिफ अल्लाउद्दीन मुलानी याची सौदी अरेबियातील दमाम येथे प्रतिष्ठित ‘ज्युनियर डिझायनर’ म्हणून निवड झाली आहे. आयटीआयच्या विद्यार्थ्याने थेट परदेशात मिळवलेल्या या ऐतिहासिक यशामुळे मोरवाडी आयटीआयच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
असिफ मुलानी याने मोरवाडी आयटीआयमध्ये शिक्षण घेताना प्रथम व द्वितीय वर्षाच्या अंतिम परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला होता. या गुणवत्तेच्या निकषावर त्याची नामवंत ‘इनप्रो’ (Inpro) कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारीसाठी (Apprenticeship) निवड झाली. तेथे त्याने प्रशिक्षक (Trainee) म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
असिफचे उत्कृष्ट कामकाज, तांत्रिक कौशल्य, मेहनत आणि प्रामाणिकपणा पाहून इनप्रो कंपनीने त्याची सौदी अरेबिया येथील मुख्य कंपनीमध्ये ज्युनियर डिझायनर म्हणून थेट निवड केली. विशेष म्हणजे, त्याच्या परदेश गमनाचा आणि व्हिसासह सर्व आवश्यक खर्च कंपनी स्वतः करणार आहे.
असिफचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर आणि प्रेरणादायी राहिला आहे. आई-वडिलांचे छत्र हरपलेले असताना आणि अत्यंत हलाखीची कौटुंबिक परिस्थिती असतानाही त्याने कधीही हार मानली नाही. त्याच्या या यशापासून प्रेरणा घेऊन त्याच्या बहिणीनेही चालू शैक्षणिक वर्षात मोरवाडी आयटीआयमध्ये ‘ड्राफ्ट्समन मेकॅनिकल’ या मोफत व कौशल्याधारित ट्रेडला प्रवेश घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयटीआय मोरवाडी अशा गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली लवकरच विभागांतर्गत ‘परदेशी शिक्षण व रोजगार’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात येणार आहे, ज्यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही जागतिक पातळीवर संधी उपलब्ध होतील.
असिफने मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल मोरवाडी आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील, गटनिदेशक आर. एस. ओव्हाळ, निदेशक व्ही. व्ही. काळोखे यांच्यासह सर्व गटनिदेशक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस उदंड शुभेच्छा दिल्या.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
