news
Home पिंपरी चिंचवड ‘दरमहा २१०० रुपये मानधन अन् अपात्र महिलांचा समावेश करा’; लाडक्या बहिणींचा राज्य सरकारला थेट इशारा!

‘दरमहा २१०० रुपये मानधन अन् अपात्र महिलांचा समावेश करा’; लाडक्या बहिणींचा राज्य सरकारला थेट इशारा!

कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने मुंबईत आक्रोश मोर्चाचे नियोजन; पिंपरी-चिंचवड व पुण्यासह राज्यभरातून महिलांचा एल्गार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा!

मुंबई / पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ३० ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आल्याच्या निषेधार्थ आणि अपात्र ठरवलेल्या महिलांना पुन्हा योजनेत सहभागी करून घेण्याच्या मागणीसाठी मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे लाडक्या बहिणींचा धडक आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता होणाऱ्या या आंदोलनात पिंपरी-चिंचवड, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने महिला सहभागी होणार असल्याची माहिती कष्टकरी संघर्ष महासंघाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून सुरुवातीला सुमारे २ कोटी ४७ लाख लाभार्थी महिलांना लाभ देण्यात आला होता. मात्र, आता आर्थिक बोजाचे कारण पुढे करत आधी सुमारे ८० लाख आणि आता तब्बल १ कोटीपर्यंत लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्यात आल्याचे कष्टकरी संघर्ष महासंघाने म्हटले आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे पात्र व खऱ्या गरजू महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे. अपात्र ठरवलेल्या सर्व गरजू महिलांना तातडीने योजनेत पुन्हा समाविष्ट करण्यात यावे.  बंद झालेली ‘ई-केवायसी‘ (e-KYC) प्रक्रिया पुन्हा त्वरित सुरू करण्यात यावी.  लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये मानधन देण्यात यावे.

कष्टकरी संघर्ष महासंघ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या मोर्चाचे नियोजन व संयोजन माधुरी जलमुलवार, रुक्मिणी जाधव, अर्चना कांबळे, लक्ष्मी गायकवाड, सविता करपे, सुनंदा लोंढे, अश्विनी मालुसरे, सुनीता दिलपाक, प्रियांका काटे, नंदा तेलगोटे, सुनीता पोतदार, माया शेटे, जरिता वाठोरे, स्वाती पालके, मनीषा हाके, शीतल धनगर, नंदा जाधव, सिंधू जाधव, विजया पाटील, वहिदा शेख, कमल लष्करे आदी महिला पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार असून, राज्य सरकारने महिलांच्या या तीव्र आक्रोशाची आणि मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!