44
धर्मादाय रुग्णालयांतील ICU/बेडच्या नावाखाली योजनांचा लाभ नाकारल्याच्या तक्रारींची चौकशी करा — सनराईज मेडिकल फाउंडेशनची मागणी
पुणे/पिंपरी प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ३० ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे: धर्मादाय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या गरीब व गरजू रुग्णांना “हा प्रायव्हेट ICU किंवा बेड आहे” तसेच “येथे कोणतीही शासकीय आरोग्य योजना लागू होत नाही” असे सांगून योजनांचा लाभ नाकारला जात असल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या सर्व प्रकरणांची प्रशासनाने तातडीने सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी सनराईज मेडिकल फाउंडेशनने केली आहे.
या संदर्भात सनराईज मेडिकल फाउंडेशनच्या वतीने मा. धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांना ई-मेलद्वारे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे.
धर्मादाय संस्थांना मिळणाऱ्या जमिनी, कर सवलती व इतर शासकीय सुविधांच्या पार्श्वभूमीवर त्यांची सामाजिक बांधिलकी आणि रुग्णहिताची मोठी जबाबदारी असते. मात्र, काही धर्मादाय रुग्णालयांमध्ये ICU किंवा बेडबाबत रुग्णांना चुकीची माहिती देऊन त्यांना शासकीय योजनांपासून वंचित ठेवले जात आहे का, तसेच त्यांच्याकडून अवाजवी शुल्क आकारले जात आहे का, याची निष्पक्ष तपासणी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे फाउंडेशनने निवेदनात नमूद केले आहे.
तपासणीदरम्यान पात्र आणि गरजू रुग्णांना योजनांचा लाभ नाकारल्याचे किंवा त्यांची फसवणूक झाल्याचे आढळल्यास, संबंधित रुग्णालय प्रशासनाविरुद्ध नियमांनुसार कडक व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सनराईज मेडिकल फाउंडेशनचे CEO डॉ. सतीश कांबळे यांनी केली आहे. या मागणीमुळे धर्मादाय रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला चाप बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
