45
पिंपरी-चिंचवड शहर दिव्यांगांसाठी अधिक समावेशक व सुलभ करणार; दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ३१ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
दिव्यांग नागरिकांना समान संधी, आवश्यक सुविधा आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देत त्यांचे जीवन अधिक सुलभ व सक्षम करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहे. या उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या संचालक मंडळाची बैठक आयुक्त तथा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत दिव्यांगांचे शिक्षण, रोजगार, कौशल्यविकास, पुनर्वसन, आरोग्य आणि सर्वांगीण सक्षमीकरणाबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, कंपनी सचिव गिरीश परळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, सल्लागार विजय कान्हेकर, वास्तुविशारद अभिजित मुरुगकर यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
दिव्यांग मुलांना व व्यक्तींना निसर्गाच्या सान्निध्यात आनंददायी व संवेदनात्मक अनुभव घेता यावा, यासाठी शहरातील विविध उद्यानांमध्ये ‘संवेदनानुभव उद्यान’ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्पर्श, ध्वनी, सुगंध आणि दृश्य अनुभवांच्या माध्यमातून दिव्यांग मुलांच्या संवेदनात्मक विकासाला चालना देणे आणि त्यांना आनंदाचे हक्काचे स्थान उपलब्ध करून देणे हा यामागचा मुख्य हेतू आहे.
दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी औद्योगिक वसाहतींमधील उद्योग व आस्थापनांशी समन्वय साधण्यात येत आहे.
• आतापर्यंत १२०० पेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तींची नोंदणी झाली आहे.
• ६५० जणांची कौशल्यनिहाय तपासणी पूर्ण झाली असून, ३५ दिव्यांगांना विविध कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांनी दिली.
दिव्यांगांच्या रोजगारासाठी भारतीय उद्योग महासंघाचे (CII) संचालक प्रसाद बच्छाव यांच्याशी संवाद साधून विशेष चर्चासत्र आयोजित करण्याचे नियोजन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
दिव्यांग नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी सहजतेने वावरता यावे, यासाठी सार्वजनिक इमारती व नागरी सुविधांची सुलभता तपासणी (Accessibility Audit) केली जाणार आहे. आवश्यक त्या सुधारणा करून सार्वजनिक सुविधा अडथळामुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या सक्षमीकरण योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर केला जाईल.
दिव्यांग व्यक्तींची दैनंदिन काळजी घेणाऱ्या काळजीवाहू व्यक्तींना शास्त्रीय प्रशिक्षण मिळावे, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने विशेष ‘काळजीवाहू प्रशिक्षण अभ्यासक्रम’ सुरू केला जाणार आहे. यामुळे दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांना प्रशिक्षित काळजीवाहूंचा मोठा आधार मिळणार आहे.
दिव्यांग व्यक्तींना केवळ सुविधा न देता त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून स्वावलंबी बनवणे हेच फाऊंडेशनचे ध्येय असल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवड शहर अधिक समावेशक, सुलभ, सुरक्षित आणि दिव्यांग-अनुकूल बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
