news
Home अमरावती अहोरात्र शहर स्वच्छ ठेवणाऱ्या हातांना प्रेमाची राखी; अमरावतीतील नवसारी ते बडनेरा परिसरात कामगारांचा सत्कार!

अहोरात्र शहर स्वच्छ ठेवणाऱ्या हातांना प्रेमाची राखी; अमरावतीतील नवसारी ते बडनेरा परिसरात कामगारांचा सत्कार!

जात-धर्माच्या भिंती ओलांडून समानता अन् बंधुतेचा दिला संदेश; सामाजिक संघटना आणि महिला बचत गटांचा संयुक्त पुढाकार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

सफाई कामगारांना राखी बांधून संविधान मूल्यांचा संदेश; ‘आम्ही भारताचे लोक’ उपक्रमातून अमरावतीत स्वच्छता कामगारांचा सन्मान!

अमरावती, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. ३१ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: रक्षाबंधनाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून अमरावती शहरातील सफाई कामगार बांधवांना राखी बांधून त्यांच्या अहोरात्र सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. ‘आम्ही भारताचे लोक’ या उपक्रमांतर्गत ‘संविधान जागर अभियान अमरावती’ सह विविध सामाजिक संघटना व महिला बचत गटांच्या वतीने हा स्तुत्य व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.
अमरावती शहरातील नवसारी, दस्तूर नगर, फरशी स्टॉप, मिल चाळ, पंचशील नगर, रमाबाई आंबेडकर नगर, माताफैल तसेच बडनेरा परिसरातील सफाई कामगारांशी सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट संवाद साधत त्यांना प्रेमाची राखी बांधली. शहराचे आरोग्य व स्वच्छता राखण्यासाठी दररोज अखंड श्रम करणाऱ्या या सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल उपस्थितांनी मनापासून आभार मानले.

या उपक्रमाच्या माध्यमातून जात, धर्म आणि पंथाच्या भिंती ओलांडून संविधानातील समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही सर्वोच्च मूल्ये प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा संदेश देण्यात आला. रक्षाबंधनाचा सण केवळ कौटुंबिक नात्यापुरता सीमित न ठेवता, समाजातील खऱ्या अर्थाने राबणाऱ्या कष्टकरी घटकांशी आपुलकीचे आणि माणुसकीचे घट्ट नाते निर्माण करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न ठरला.

कार्यक्रमप्रसंगी सफाई कामगार व स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना संविधानाची ओळख, अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि व्यसनमुक्ती या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कोणत्याही अंधश्रद्धांना बळी न पडता विवेकवादी व वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आणि व्यसनांपासून दूर राहून आरोग्यदायी जीवन जगण्याचे आवाहन करण्यात आले.

हा उपक्रम संविधान जागर अभियान अमरावती, क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावती, महिला राजसत्ता आंदोलन, जनसेवा वस्ती स्तर संघ, संकल्प वस्ती स्तर संघ, बुद्धछाया वस्ती स्तर संघ आणि महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत उत्साहात पार पडला.
या प्रसंगी साथी विजय डवरे, प्रफुल्ल मंदा श्रीधर, किरण दुपारे, सीमा मडामे, उषा कोठार, नंदा गुप्ता, वर्षा पकडे, नूतन वासनिक, निलू मेश्राम, अनुपमा गोंडाने, कुंदा मेश्राम, वैशाली राऊळ, सुरेखा तायडे, रंजना भजगवरे, प्रतिभा खापरे, दिलीप लाडे, आशिष देशमुख यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला बचत गटांच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या संपूर्ण उपक्रमाचे यशस्वी संयोजन संविधान जागर अभियानाचे साथी विजय डवरेबबिता वानखडे यांनी केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!