126
पत्रकारिता क्षेत्रात ‘मॅक्स मंथन न्यूज’चे कार्य प्रशंसनीय; सांगवी येथे सामाजिक कार्यकर्ते सुनील पोकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी सुनील पोकरे, दि. ३१ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
सांगवी / पिंपरी: “१४ एप्रिल २०२४ रोजी सुरू झालेल्या ‘मॅक्स मंथन न्यूज’ या वृत्तवाहिनीने अत्यंत अल्पावधीतच जनसामान्यांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच नागरिकांच्या विविध प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडण्याचे कार्य मॅक्स मंथन न्यूज करत आहे. सत्य, निष्पक्षता आणि सामाजिक बांधिलकी जपत प्रशासन व जनता यांच्यातील मजबूत दुवा म्हणून हे चॅनेल प्रभावी भूमिका बजावत आहे. मराठीतील विश्वसनीय आणि सत्य बातम्या जनतेपर्यंत पोहोचवणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे,” असे प्रतिपादन ‘मॅक्स मंथन न्यूज’च्या पिंपरी-चिंचवड पत्रकारपदी नुकतीच निवड झालेले सामाजिक कार्यकर्ते सुनील पोकरे यांनी केले.
सांगवी येथील संत गजानन महाराज मंदिरासमोरील ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर सामाजिक कार्यकर्ते सुनील पोकरे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. याच प्रसंगी मॅक्स मंथन न्यूजच्या पत्रकारपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर दळवी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मुरलीधर दळवी यांनी सुनील पोकरे यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “सुनील पोकरे यांनी अत्यंत खडतर परिस्थिती आणि गरिबीचा सामना करत आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. कौटुंबिक संसार, नोकरी आणि सामाजिक कार्याची धुरा सांभाळत, वेळप्रसंगी रात्रीच्या महाविद्यालयात (नाईट कॉलेज) जाऊन त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांचा हा प्रवास तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.”
सोनार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत फकटकर यांनी सुनील पोकरे यांना वाढदिवसाच्या व पत्रकारपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच कट्ट्यावरील उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांनी पोकरे यांच्या भावी सामाजिक व वृत्तपत्रीय वाटचालीस उदंड शुभेच्छा दिल्या.
या स्नेहसोहळ्याचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर दळवी व सूर्यकांत फकटकर यांनी केले होते. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक नाटकें, सांडभोर, पिंपळे, मांढरे, गोसावी, जगताप, अशोकराव भोसले यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
