news
Home पुणे पंतप्रधान, महापौर ते थेट डीजे प्रदूषणाविरोधात पुणेकरांचा पत्रांचा पाऊस; हुजूरपागा येथे जमला भावूक सोहळा!

पंतप्रधान, महापौर ते थेट डीजे प्रदूषणाविरोधात पुणेकरांचा पत्रांचा पाऊस; हुजूरपागा येथे जमला भावूक सोहळा!

'स.न.वि.वि.' अन् 'लोभ असावा'चा सांस्कृतिक जागर; विनामूल्य लिफाफे व पोस्टमनच्या व्यवस्थेने उपक्रमात भरली रंगत | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘पत्रास कारण की…’ उपक्रमाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; जागतिक पत्रलेखन दिनानिमित्त हुजूरपागा येथे रंगला पत्रलेखनाचा अनोखा सोहळा!

पुणे/पिंपरी चिंचवड प्रतिनिधी सुनील पोखरे, दि. ३० ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज: 

पुणे” “संगणक आणि मोबाईलच्या या आधुनिक जगात मनातील भावनांचा झरा आटत चालला असून, पत्रातल्या ओल्या शाईत असलेला मायेचा ओलावा पार सुकून गेला आहे. निरोप देणारा पोस्टाचा लाल डबाच आता निरोप घेण्याच्या तयारीत आहे,” अशा शब्दांत प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री गौरी देशपांडे यांनी आपल्या संमिश्र भावना व्यक्त केल्या. निमित्त होते १ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या ‘जागतिक पत्रलेखन दिवसा’चे.
डिजिटल युगात हरवत चाललेल्या पत्रलेखन संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी ‘के अँड क्यू परिवार’ आणि पुणे शहर प्रधान डाकघर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पत्रास कारण की…’ या अभिनव व उपक्रमशील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रविवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत लक्ष्मीरोड येथील ‘श्रीमंती दुर्गाबाई मुकुंददास लोहिया महिला वाणिज्य महाविद्यालय’ (हुजूरपागा) येथे हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
या प्रसंगी पुणे शहर प्रधान डाकघराच्या वतीने अधिकारी सुनील मोटे, श्रीकृष्ण मते आणि अक्षय निकम उपस्थित होते. उपक्रमात सहभागी झालेल्या पुणेकरांना पत्र लिहिण्यासाठी लागणारे पेन, कागद आणि टपाल पाकीट (लिफाफे) कार्यक्रमस्थळीच विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच टपाल विभागाच्या वतीने प्रत्यक्ष पत्रे टाकण्यासाठी खास टपालपेटी (लेटर बॉक्स) आणि पोस्टमनचीही विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

या उपक्रमात अभिनेत्री गौरी देशपांडे यांनी स्वतः पत्र लिहून जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर शेकडो पुणेकरांनी आपल्या आप्तस्वकीयांना, मित्र-मैत्रिणींना आणि लाडक्या नातेवाईकांना स्वहस्ते उत्स्फूर्तपणे पत्रे लिहून ती थेट टपालपेटीत टाकली.
काही नागरिकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीपुण्याच्या महापौरांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या, तर एका पुणेकर महिलेने सध्या शहरात ऐरणीवर असलेल्या ‘डीजे’ (DJ) च्या प्रदूषणाविरोधात पत्र लिहून प्रशासनाचे लक्ष वेधले.

“स.न.वि.वि.” आणि “कळावे, लोभ असावा” हे शब्द आणि भावना नव्या पिढीपर्यंत पोहोचवून पत्रलेखनाची हरवत चाललेली ही सुंदर संस्कृती पुन्हा जिवंत करावी, असे आवाहन ‘के अँड क्यू परिवारा’चे सत्येंद्र राठी यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी गांधी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राहुल इंदानी यांनी मानले. या सोहळ्यामुळे पुणेकरांना एका वेगळ्या आणि भावूक सांस्कृतिक अनुभवाची अनुभूती मिळाली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!