news
Home पिंपरी चिंचवड ‘आशा से श्रेया तक’ सांगीतिक मेजवानीने रसिक भारावले; भाऊसाहेब भोईर यांच्या सांस्कृतिक योगदानाचे पिंपरीत कौतुक!

‘आशा से श्रेया तक’ सांगीतिक मेजवानीने रसिक भारावले; भाऊसाहेब भोईर यांच्या सांस्कृतिक योगदानाचे पिंपरीत कौतुक!

संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान; "माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान" श्रेया घोषाल यांचे भावूक उद्गार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

संघर्ष अन् साधना म्हणजे आशाताई; पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांना २१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ प्रदान!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ३० ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

चिंचवड / पिंपरी: “संघर्ष आणि साधना म्हणजे आशाताई भोसले. अशा महान आणि उत्तुंग नावाचा पुरस्कार मिळणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. लतादीदी, आशाताई, हृदयनाथजी आणि उषाताई यांची गाणी ऐकूनच मी लहानाची मोठी झाले. संगीतातील ‘सा’ देखील यांच्यामुळेच शिकले. माझे पहिले मराठी गाणे ‘गणराज रंगी नाचतो’ हे रेकॉर्ड झाले तेव्हा मी अवघ्या १३ वर्षांची होते. भाऊसाहेब भोईर यांच्या निमंत्रणाचा मनापासून स्वीकार करून पिंपरी-चिंचवड शहरासाठी लवकरच एक भव्य सांगीतिक कार्यक्रम करेन,” असे भावूक उद्गार आंतरराष्ट्रीय ख्यातीची पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांनी काढले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा, पिंपरी-चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित ‘२१ वा आशा भोसले पुरस्कार २०२६’ श्रेया घोषाल यांना ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

₹१,११,०००/- रोख, शाल, श्रीफळ, मानपत्र आणि सन्मानचिन्ह पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते तर पारंपरिक पैठणी मानसी भोईर-घुले यांच्या हस्ते देऊन श्रेया घोषाल यांना सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यास अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, ज्येष्ठ उद्योजक कृष्ण कुमार गोयल, नगरसेवक गौरव घुले, मानसी भोईर-घुले, वंदना घांगूर्डे, रुणाल सांकला, दिलीप काटकर, हर्षवर्धन भोईर, किरण येवलेकर, राजू बंग आणि गौरी लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक करताना भाऊसाहेब भोईर म्हणाले, “या सांगीतिक प्रवासाचा श्वास लतादीदी आहेत, तर उच्छवास आशादीदी आणि याचे हृदय म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर आहेत. लतादीदींना देश ‘दीदी’ म्हणतो, तसेच आता श्रेया घोषाल या आमच्या ‘छोटी दीदी’ आहेत.” पिंपरी-चिंचवड शहराला केवळ ‘औद्योगिक नगरी’ न ठेवता तिला एक समृद्ध ‘सांस्कृतिक नगरी’ बनवण्यात भाऊसाहेब भोईर यांनी गेल्या अनेक दशकांपासून अविरत प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या योगदानामुळे पिंपरी-चिंचवडची सांस्कृतिक ओळख देशभर पोहोचली आहे.

सोहळ्यात आमदार अमित गोरखे यांनी भाऊसाहेब भोईर यांचे कौतुक करताना मिश्कील टोलेबाजी केली. ते म्हणाले, “भाऊसाहेब भोईर हे खऱ्या अर्थाने पिंपरी-चिंचवड शहराचे ‘सांस्कृतिक मंत्री’ आहेत. भोईर जर यापूर्वी भाजपमध्ये आले असते, तर आज ते राज्याचे अधिकृत सांस्कृतिक मंत्री झाले असते; पण अजूनही वेळ गेलेली नाही!” आमदार गोरखे यांच्या या वक्तव्यावर प्रेक्षागृहात उपस्थितांनी टाळ्यांचा तुफान कडकडाट करत उत्स्फूर्त दाद दिली आणि राजकीय चर्चांना उधाण आले.
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनीही श्रेया घोषाल यांच्या बालपणाच्या आठवणींना उजाळा देत, “भाऊसाहेब भोईर भविष्यात आमदार व्हावेत,” असा मनापासून आशीर्वाद दिला. तर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी, “आशा भोसले यांच्या नावाने दिला जाणारा हा राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वोच्च सन्मान आहे,” असे सांगितले.

पुरस्कार वितरणानंतर मोरया थिएटर निर्मित ‘आशा से श्रेया तक’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम रंगला. याच मंचावर श्रेया घोषाल यांच्या हस्ते मानसी भोईर-घुले यांच्या “मानसी रेस्कोर” या म्युझिकल बँडचे अधिकृत अनावरण करण्यात आले. आशा भोसले आणि श्रेया घोषाल यांच्या गाजलेल्या सदाबहार गीतांनी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
२००२ पासून सुरू झालेल्या या पुरस्काराच्या गौरवशाली परंपरेत स्व. लता मंगेशकर, खय्याम, बप्पी लहरी, प्यारेलालजी, पं. शिवकुमार शर्मा, शंकर महादेवन, सोनू निगम, सुनिधी चौहान व उदित नारायण यांसारख्या महामेरूंचा सन्मान झाला असून, यावर्षी श्रेया घोषाल यांच्या समावेशाने या परंपरेची शोभा आणखी वाढली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!