23
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ७५ वा ‘भटके-विमुक्त दिवस’ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दि. ०१ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: महानगरपालिकेच्या वतीने ७५ वा ‘भटके-विमुक्त दिवस’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर, परिसंवाद, ढोल-ताशांचा गजर आणि प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भटके-विमुक्त घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिक प्रगतीसाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा दृढ निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.
विमुक्त जात समूहाला ब्रिटिश राजवटीत १८७१ सालापासून गुन्हेगार जमात संबोधून तारेच्या कुंपणात बंदिस्त करण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर ३१ ऑगस्ट १९५२ रोजी भारत सरकारने या घटकांची या जोखडातून मुक्तता केली. या ऐतिहासिक स्वातंत्र्याचा जागर भाटनगर, पिंपरी येथे आयोजित कार्यक्रमातून करण्यात आला. बंदिस्त तारेच्या कुंपणात जन्म झालेले आणि सध्या १०३ वर्षे वय असलेल्या समर्थ सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज सोलापूरकर यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली.

महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या अधिपत्याखाली आयोजित या सोहळ्यास ‘ब’ प्रभाग अध्यक्ष मंदार देशपांडे, माजी महापौर कविचंद भाट, नगरसदस्य डब्बू आसवानी, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त गोरख लिमन, कामगार नेते तथा भाट समाज सेवा ट्रस्टचे शहर अध्यक्ष मनोज माछरे, माजी जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, भटक्या-विमुक्त जाती-जमाती सामाजिक आधार संघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ सावंत, ललित कासार, पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक सुनील मलके, निवृत्त सहायक आयुक्त सुभाष माछरे, तसेच सामाजिक कार्यकर्ते नेताजी शिंदे, अक्षय माछरे, विक्की तामचीकर, भूपेंद्र तामचीकर, अभय भाट, रामचंद्र भाट, संजू घमंडे, सुभाष माछरे, विशाल भाट, धीरज तामचीकर, नरेंद्र तामचीकर, ॲड. वर्षा तामचीकर, वनिता अभंगे, डॉ. स्नेहा माछरे, नम्रता भाट, शीतल भाट, ॲड. अजय नवले, रामभाऊ बाटुंगे, जतन बार्डे, मनोहर अबवेकर, कुलदीप तमायची आदी उपस्थित होते.
समाजसेवा, अध्यात्म आणि मानवकल्याणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे समर्थ सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज सोलापूरकर यांचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.
या वेळी मार्गदर्शन करताना सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज म्हणाले, “समाजाची प्रगती केवळ मदतीची अपेक्षा करून होत नाही, तर शिक्षण, उद्योग आणि स्वावलंबनातून होते. आपल्या समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षणाची आणि तरुणांना रोजगाराची संधी मिळाली पाहिजे.” त्यांनी या वेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्याशी झालेल्या भेटींचे ऐतिहासिक प्रसंग आणि तारेच्या कुंपणातील अन्यायाच्या कटू आठवणीही विशद केल्या.
विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी मानवी हक्कांवर भर देत सांगितले, “मानसिक गुलामगिरीची कुंपणे तोडण्यासाठी शिक्षण, संघटन आणि एकजूट हीच आपली खरी ताकद आहे. प्रत्येक मुलगा-मुलगी शिकली पाहिजे.” तसेच प्रभाग अध्यक्ष मंदार देशपांडे यांनी भटक्या-विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मनपाच्या वतीने सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले. मनोज माछरे यांनीही या वेळी आपले मनोगत व्यक्त केले.
उपक्रमांतर्गत ३१ नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली, तर २१० नागरिकांनी मोफत वैद्यकीय तपासणीचा लाभ घेतला. सायंकाळच्या सत्रात निर्मिक आर्ट्स मीडिया प्रस्तुत ‘भटके-विमुक्त लोकसंस्कृतीचा जागर’ हा सांस्कृतिक कार्यक्रम व मोरया ढोल-ताशा पथकाच्या वादनाने कार्यक्रमात मोठी रंगत आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले, प्रास्ताविक प्रकाश रावळकर यांनी तर आभार विष्णू भाट यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

