news
Home अमरावती ‘आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम अन् सुरक्षित करण्यासाठी शासन कटिबद्ध’; अमरावती दुर्घटनेनंतर पालकमंत्री बावनकुळे आक्रमक!

‘आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम अन् सुरक्षित करण्यासाठी शासन कटिबद्ध’; अमरावती दुर्घटनेनंतर पालकमंत्री बावनकुळे आक्रमक!

खासगी रुग्णालयांमध्ये हलवलेल्या बालकांची प्रकृती स्थिर; चौकशी समितीचा अहवाल येताच दोषींवर कठोर कारवाईचा सज्जड इशारा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात अत्याधुनिक अतिदक्षता विभागाची नव्याने उभारणी करणार — पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. ०१ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: “अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेत ३ बालकांचा मृत्यू झाला, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या ठिकाणचा अतिदक्षता विभाग (ICU) हा गरजूंसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने ‘एम्स’च्या (AIIMS) मानकांनुसार अत्याधुनिक आणि सर्व सुविधांनी सुसज्ज अशा अतिदक्षता विभागाची नव्याने उभारणी करण्यात येईल,” अशी घोषणा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मुरके हॉस्पिटल आणि जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. या वेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, आमदार रवी राणा आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले की, “दुर्घाटना घडल्यानंतर आपत्कालीन वेळेत नवजात शिशूंचे जीव वाचविणे ही आपली पहिली प्राथमिकता होती. तत्परतेने ३६ बालकांना खासगी रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. योग्य उपचारांमुळे या सर्व बालकांची प्रकृती आता स्थिर व उत्तम आहे. आरोग्य मंत्र्यांनी घटनेच्या दिवशीच भेट देऊन आरोग्य आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती जाहीर केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त होताच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”

जिल्हा स्त्री रुग्णालयासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे स्पष्ट करत पालकमंत्री म्हणाले, “भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी जागतिक दर्जाची उपकरणे बसवून नवीन अतिदक्षता कक्ष तयार केला जाईल. जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि सुरक्षित करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.”

दुर्घटनेत प्राण गमावलेल्या बालकांच्या पालकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. या वेळी स्वप्निल बोरंगे, प्रफुल्ल चोपडे आणि गंगाराम बेठेकर या पालकांना हे धनादेश देण्यात आले. तसेच संकटसमयी नवजात बालकांवर मोफत व यशस्वी उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांचे पालकमंत्र्यांनी विशेष आभार मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!