news
Home पिंपरी चिंचवड ‘नागरिकांना सुरक्षित व सुरळीत सुविधा द्या’; गणेशोत्सवाच्या तयारीवरून आयुक्त डॉ. सूर्यवंशी आक्रमक!

‘नागरिकांना सुरक्षित व सुरळीत सुविधा द्या’; गणेशोत्सवाच्या तयारीवरून आयुक्त डॉ. सूर्यवंशी आक्रमक!

नवीन अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारून नळ-वीज जोडणी खंडित करण्याचे आदेश; घर खरेदी करताना अधिकृतता तपासण्याचे नागरिकांना आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते, स्वच्छता व सुरक्षेला प्राधान्य द्या; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे महापालिका अधिकाऱ्यांना कडक निर्देश!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०१ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: “आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील विद्युत तारा व जोडण्यांची सुरक्षितता तपासून धोकादायक जोडण्यांवर त्वरित कार्यवाही करावी. कृत्रिम विसर्जन हौदांची तयारी, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था वेळेत पूर्ण करावी. तसेच प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याने आपला प्रभाग स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांसाठी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी,” असे स्पष्ट निर्देश पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आगामी गणेशोत्सव तसेच शहरातील नागरी सुविधांच्या अनुषंगाने आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सर्व विभागप्रमुख व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या वेळी शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, स्वच्छता, रस्ते, विद्युत सुरक्षा, उद्याने आणि नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, तृप्ती सांडभोर, सह आयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मनोज सेठिया, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, प्रेरणा सिनकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उपआयुक्त सचिन पवार, सीताराम बहुरे, राजेश आगळे, डॉ. प्रदीप ठेंगल, अण्णा बोदडे, व्यंकटेश दुर्वास, संदीप खोत, पंकज पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, सहाय्यक आयुक्त अमित पंडित, तानाजी नरळे, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, अश्विनी गायकवाड, निवेदिता घार्गे, अजिंक्य येळे, पूजा दूधनाळे, परशुराम वाघमोडे, गोरक्षनाथ लिम्हण, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे कार्यकारी अभियंता व कर्मचारी उपस्थित होते.

विसर्जनस्थळी स्वच्छता, पुरेशी प्रकाश व्यवस्था, सुरक्षा आणि आवश्यक सुविधा वेळेत पूर्ण कराव्यात. रस्ते प्राधान्याने खड्डेमुक्त करावेत.  फुटपाथवरील अतिक्रमणे तातडीने हटवून ते पादचाऱ्यांसाठी मोकळे करावेत. सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता व झाडांची छाटणी करावी. बीट निरीक्षकांमार्फत नवीन अनधिकृत बांधकामांवर बारकाईने लक्ष ठेवून ती निष्कासित करावीत. तसेच अशा बांधकामांची नळ व वीज जोडणी खंडित करण्याची कायदेशीर कारवाई करावी. नागरिकांनी घर किंवा मालमत्ता खरेदी करताना बांधकाम अधिकृत आहे की नाही, मंजूर आराखडा व महापालिका नोंदी तपासूनच खरेदी करावी, यासाठी जनजागृती करावी.  ‘सारथी’ प्रणाली आणि शासकीय संकेतस्थळांवरील नागरिकांच्या तक्रारींचा प्रलंबित न ठेवता वेळेत निपटारा करावा. लोकप्रतिनिधींच्या पत्रांना व निवेदनांना गांभीर्याने घेऊन वेळेत प्रतिसाद द्यावा. शहरातील वाचनालये, ग्रंथालये आणि व्यायामशाळांची संख्या वाढवण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय जागांचा आढावा घेऊन नियोजन करावे. गणेशोत्सव काळात सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असा पुनरुच्चार आयुक्तांनी केला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!