news
Home पिंपरी चिंचवड अवघ्या ९ व्या वर्षी १३ आंतरराष्ट्रीय पदके; बुद्धिबळपटू अन्वी हिंगेची विश्वविजेतेपदाच्या दिशेने यशस्वी घोडदौड!

अवघ्या ९ व्या वर्षी १३ आंतरराष्ट्रीय पदके; बुद्धिबळपटू अन्वी हिंगेची विश्वविजेतेपदाच्या दिशेने यशस्वी घोडदौड!

ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण; चिंचवडच्या चिमुकलीचे यश शहरासाठी अभिमानास्पद | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

चिंचवडची ९ वर्षीय अन्वी हिंगे बुद्धिबळाच्या जागतिक पटावर; १३ आंतरराष्ट्रीय पदकांसह भारताचा गौरव!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०१ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

वय अवघे नऊ वर्षे… हातात बुद्धिबळाचे मोहरे आणि डोळ्यांसमोर भारतासाठी जागतिक स्तरावर सर्वोच्च स्थान मिळवण्याचे स्वप्न! चिंचवड येथील युवा बुद्धिबळपटू अन्वी दिपक हिंगे हिने अत्यंत कमी वयात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत पिंपरी-चिंचवड शहरासह महाराष्ट्र आणि देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.
अन्वीने Woman Candidate Master (WCM) हा प्रतिष्ठेचा किताब प्राप्त केला असून FIDE Girls Under-9 रेटिंगमध्ये जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान मिळवण्याचाही बहुमान तिने संपादन केला आहे. World Cadet & Youth Rapid Chess Championship (Girls U8) स्पर्धेत उपविजेतेपद पटकावत तिने जागतिक स्तरावर आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली. अवघ्या नऊ वर्षांच्या वयात भारतासाठी तिने आतापर्यंत तब्बल १३ आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत.
ग्रीस, ताजिकिस्तान, मलेशिया आणि थायलंडसह विविध देशांमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये अन्वीने भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नुकत्याच छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य U-9 मुलींच्या अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्येही तिने विजेतेपद पटकावले. यापूर्वी महाराष्ट्र राज्य U-7 मुलींच्या गटातही ती विजेती ठरली असून राष्ट्रीय स्तरावरदेखील तिने पदके मिळवली आहेत.
अन्वीच्या या असामान्य कामगिरीची दखल राज्यस्तरावरही घेण्यात आली असून मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला आहे. विविध राष्ट्रीय व प्रादेशिक माध्यमांनीही तिच्या यशस्वी वाटचालीची दखल घेतली आहे.
अन्वी सध्या Elpro International School, Chinchwad येथे शिक्षण घेत आहे. अभ्यास आणि बुद्धिबळाचा उत्तम समतोल साधत ती ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे आणि फिडे मास्टर सिद्धांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित प्रशिक्षण घेत आहे. भारताचे प्रतिनिधित्व करून जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात सर्वोच्च स्थान प्राप्त करण्याचे तिचे ध्येय असून त्यासाठी ती सातत्याने मेहनत घेत आहे.
या वेळी अन्वीचे आई-वडील आरती दिपक हिंगे, दिपक जगन्नाथ हिंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या शलाका कोंडावार उपस्थित होते.
आज महापौर कार्यालयात अन्वीच्या आजवरच्या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले तसेच आगामी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या.
“अवघ्या नऊ वर्षांच्या वयात अन्वीने आपल्या बुद्धिमत्ता, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जागतिक स्तरावर पिंपरी-चिंचवडचे नाव पोहोचवले आहे. आपल्या शहरातील अशा गुणवंत खेळाडूंचे यश हे संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब आहे. आज अन्वीच्या हातात बुद्धिबळाचे मोहरे असले, तरी तिच्या डोळ्यांत भारतासाठी विश्वविजेतेपद मिळवण्याचे स्वप्न आहे. तिची ही जिद्द शहरातील हजारो मुला-मुलींना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देईल. अन्वीने भविष्यात जागतिक बुद्धिबळाच्या पटावर विक्रम नोंदवून भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवावा.”
— रवि लांडगे, महापौर
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!