3
पिंपरी-चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; राजस्थानच्या दोन आंतरराज्य तस्करांना बेड्या, ४.३ लाखांचा मुद्देमाल जप्त!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०४ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / मोशी: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोशी परिसरात विशेष मोहीम राबवून राजस्थानच्या दोन आंतरराज्य तस्करांना रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून मेफेड्रॉन (एम.डी.), अफिम, मोबाईल, डिजिटल वजनकाटा आणि दुचाकी असा एकूण ४,३०,०२५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिलेल्या ‘झीरो टॉलरन्स’ धोरणानुसार शहरातून अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देहू ते मोशी रोडवर बोराटेवस्ती (मोशी) येथील महालक्ष्मी फर्निचर दुकानासमोर दोन इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस हवालदार विजय दौंडकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६:१५ वाजेच्या सुमारास सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
१. आकाश कुमार भेराराम बिश्नोई (वय २१, रा. दुर्गापार्क, सस्तेवाडी, मोशी; मूळ रा. सरवाणा, ता. सांचोर, जि. जालोर, राजस्थान)
-
जप्त माल: ७१ ग्रॅम ७२० मिग्रॅ एम.डी. (Mephedrone)
२. प्रविण कुमार हिराराम बिश्नोई (वय १८, रा. दुर्गापार्क, सस्तेवाडी, मोशी; मूळ रा. कोटाडा, ता. राणीचाडी, जि. जालोर, राजस्थान)
-
जप्त माल: १०८ ग्रॅम ७३० मिग्रॅ अफिम
या दोघांकडून अंमली पदार्थांसह २ मोबाईल, १ डिजिटल वजनकाटा आणि १ दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी / पिंपरी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ॲक्ट (NDPS Act) कलम ८(क), १७(ब), २२(क), आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे २) सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक जिलानी मोमीन, पोलीस अंमलदार विजय दौंडकर, निखिल शेटे, कपिलेश इंगवे, संतोष सपकाळ, सुभाष गुरव आणि प्रतीक कवडे यांच्या पथकाने केली.
अंमली पदार्थांच्या विरोधातील ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र केली जाईल. नागरिकांना शहरात कुठेही अंमली पदार्थांची विक्री किंवा तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित अंमली पदार्थ विरोधी पथक किंवा ७७९८१००११२ या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार यांनी केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
