news
Home पिंपरी चिंचवड विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचे पाऊल; ३४ व्या टप्प्यात २ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना धडे!

विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचे पाऊल; ३४ व्या टप्प्यात २ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना धडे!

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम; १७ सप्टेंबरला होणार पुढील ३५ वा टप्पा आयोजित | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचा कौतुकास्पद उपक्रम; ‘एक दिवस शाळेसाठी’ अंतर्गत १ लाख १९ हजार विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेचे धडे!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०४ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेकडून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांची जाणीव निर्माण करण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या ‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाच्या ३४ व्या टप्प्यात शहरातील १४ शाळांमधील सुमारे २ हजार २८० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून वाहतूक पोलिसांनी रस्ता सुरक्षा व विविध सामाजिक विषयांवर मार्गदर्शन केले.
वाहतूक विभागामार्फत महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी हा उपक्रम राबविला जातो. याअंतर्गत वाहतूक शाखेच्या १४ विशेष टीम शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधतात.

दिनांक ०३ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या ३४ व्या टप्प्यात वाहतूक शाखेच्या १४ टीममधील १० पोलीस अधिकारी आणि १८ अंमलदारांनी १४ निवडक शाळांमध्ये भेट दिली. या वेळी संगणकीय सादरीकरणाद्वारे (PPT) विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या विषयांवर मुद्देसूद मार्गदर्शन करण्यात आले.  रस्ता सुरक्षा आणि अपघात प्रतिबंध वाहतूक नियमांचे पालन, रस्ता ओलांडताना घ्यावयाची काळजी आणि सुरक्षित प्रवास. व्यसनमुक्ती अंमली पदार्थ व विविध व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचे आवाहन. सायबर गुन्हेगारी व सोशल मीडिया डिजिटल सुरक्षितता, सोशल मीडियाचा सुरक्षित व जबाबदार वापर.

विद्यार्थ्यांनी भविष्यात एक जबाबदार नागरिक आणि उत्तम माणूस बनावे, या दृष्टिकोनातून पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागामार्फत या प्रबोधनपर उपक्रमाचे सातत्याने यशस्वी नियोजन केले जात आहे. आतापर्यंत पार पडलेल्या ३४ टप्प्यांमध्ये तब्बल ५४४ शाळांमधील १,१९,४७१ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले आहे.

हा विद्यार्थीभिमुख उपक्रम पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह-आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस उप-आयुक्त विक्रांत देशमुख तसेच वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या माध्यमातून यशस्वीरीत्या राबविला जात आहे.
या उपक्रमाचा पुढील (३५ वा) टप्पा गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित केला जाणार असल्याची माहिती पोलीस उप-आयुक्त विक्रांत देशमुख यांनी दिली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!