27
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ‘नॉर्थईस्ट कम्युनिटी ऑर्गनायझेशन’साठी विशेष सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०५ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरातील ‘नॉर्थईस्ट कम्युनिटी ऑर्गनायझेशन’च्या विद्यार्थी व नागरिकांसाठी विशेष सायबर गुन्हे जनजागृती (Cyber Crime Awareness) उपक्रम आयोजित करण्यात आला होता. पोलीस आयुक्तालयातील शिवनेरी हॉल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास ईशान्य भारतातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पिंपरी-चिंचवड शहर परिसरात शिक्षण आणि व्यवसायानिमित्त राहणाऱ्या ईशान्य भारतातील नागरिकांना सायबर विश्वातील धोके आणि सुरक्षेबाबत जागरूक करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ‘नॉर्थईस्ट कम्युनिटी ऑर्गनायझेशन’चे अध्यक्ष सिंगम होरम, माजी अध्यक्ष सोरिओ हिटलर यांच्यासह ईशान्य भारतातील २२ नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड आणि अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली यांनी उपस्थितांशी संवाद साधून सुरक्षिततेचा विश्वास दिला. त्यानंतर विशेष शाखेचे पोलीस उप-आयुक्त धीरज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पंधरकर, आर्थिक गुन्हे व सायबर शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त रोहिणी बानकर, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे आणि पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण यांनी मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. डिजिटल पेमेंट, बँक फ्रॉड आणि आर्थिक फसवणूक कशी घडते आणि ती टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी. उपस्थितांच्या विविध शंकांचे निरसन करून सायबर सुरक्षेबाबत उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि तातडीच्या मदतीसाठी पोलिसांनी या हेल्पलाईन क्रमांकांची माहिती दिली. सायबर तक्रारीसाठी सायबर हेल्पलाईन: १९३० , आणीबाणीच्या प्रसंगी तातडीची मदत: ११२ , अंमली पदार्थांविषयी तक्रार नोंदवण्यासाठी: ७७९८१००११२ या उपक्रमामुळे पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या ईशान्य भारतातील विद्यार्थी व नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी विश्वास, सुरक्षितता आणि समाजात आपलेपणाची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

