news
Home मुख्यपृष्ठ ‘माणसाचा सन्मान जन्म किंवा जातीवरून नव्हे, तर कर्तृत्वाने ठरावा’; पिंपरीत महर्षी दयानंद सरस्वती स्मृती सोहळ्यात विचारवंतांचे प्रतिपादन!

‘माणसाचा सन्मान जन्म किंवा जातीवरून नव्हे, तर कर्तृत्वाने ठरावा’; पिंपरीत महर्षी दयानंद सरस्वती स्मृती सोहळ्यात विचारवंतांचे प्रतिपादन!

महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेकडून सोहळ्याचे आयोजन; म्हस्के वाडा व भिडे वाड्याच्या वंशजांचा विशेष नागरी गौरव | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला: वेदपालजी आर्य; ‘पुणे प्रवास प्रवचने’ १५१ वा स्मृती समारंभ पिंपरीमध्ये उत्साहात संपन्न!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०७ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “माणसाचा सन्मान हा त्याच्या जन्म आणि जातीवरून ठरवला जाऊ नये. शूद्र व वंचित घटकांनादेखील वेद वाचता आले पाहिजेत आणि ते समजले पाहिजेत, या उद्देशाने थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि मागासवर्गीय नागरिकांच्या आग्रहास्तव महर्षी दयानंद सरस्वती यांनी १८७५ साली पुण्यातील मोमीनपुरा येथे ऐतिहासिक व्याख्यान दिले होते. आपल्या एकूण ३५ व्याख्यानांमधून त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा खरा मार्ग दाखवला,” असे प्रतिपादन वेदपालजी आर्य यांनी केले.
महर्षी दयानंद सरस्वती यांच्या ‘पुणे प्रवास प्रवचने’ १५१ व्या स्मृती समारंभानिमित्त महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा (पिंपरी, पुणे, नाना पेठ, वारजे, खडकी, आळंदी व चिंचवड आर्य समाज) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. ६ सप्टेंबर) पिंपरी येथील आर्य समाज भवनात विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष व पिंपरी आर्य समाज प्रधान सुरेंद्र करमचंदानी, सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा दिल्लीचे महामंत्री ॲड. प्रकाश आर्य, दिल्ली आर्य प्रतिनिधी सभेचे महामंत्री विनय आर्य, राजस्थानचे वैदिक विद्वान आचार्य कर्मवीर मेधार्थी, मध्य प्रदेशचे ऋतूस्पती आर्य, प्रमोद तिवारी, प्रमोद मिश्रा, बाळकृष्ण भिडे यांच्या वंशज छाया बर्वे भिडे, ॲड. गंगाराम भाऊ म्हस्के यांचे वंशज राजेंद्र म्हस्के, आणि समन्वयक प्रा. साईनाथ पुण्णे मुख्य व्यासपीठावर उपस्थित होते.
या प्रसंगी महर्षी दयानंद सरस्वती यांनी पुण्यात दिलेल्या १५ प्रमुख व्याख्यानांचा समावेश असलेल्या “प्रबोधन काळातील पुणे प्रवचन” या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच छाया बर्वे भिडे, राजेंद्र म्हस्के आणि प्रा. साईनाथ पुण्णे यांचा विशेष गौरव करण्यात आला.

 “१७५ वर्षांपूर्वी पुण्यात महर्षी दयानंद सरस्वती यांच्या व्याख्यानाला व मिरवणुकीला विरोध झाला होता. मात्र आज त्याच पुण्यातील ऐतिहासिक म्हस्के वाडा ते भिडे वाडा दरम्यान निघालेल्या मिरवणुकीवर पुणेकरांनी उत्साहाने पुष्पवृष्टी केली. या सामाजिक व वैचारिक परिवर्तनासाठी १५१ वर्षांचा काळ जावा लागला.” – आचार्य कर्मवीर मेधार्थी
“महर्षींनी सती प्रथेला ठाम विरोध करत महिलांना समाजात सन्मान मिळवून दिला. वेदपठणातील भेदभाव मोडून काढत सर्वांसाठी गुरुकुल संकल्पना सुरू केली आणि महिलांना वेदपठणमुक्त केले. आजच्या भरकटत जाणाऱ्या तरुण पिढीला त्यांचे विचार मार्गदर्शक ठरतील.” – ऋतूस्पती आर्य

 

“न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, महात्मा जोतीराव फुले, नाना जगन्नाथ शंकरशेठ आणि शेकडो विद्वानांच्या उपस्थितीत मागासवर्गीय वस्तीत जाऊन वेदांवर व्याख्यान देण्याचे अद्भूत धाडस स्वामींनी केले. युवा पिढीने हा गौरवशाली इतिहास अभ्यासावा.” – महामंत्री विनय आर्य

 

“समाजातील विषमता आणि जातीभेद पूर्णपणे नष्ट करणे हा स्वामींचा मुख्य उद्देश होता. भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या युवा पिढीला योग्य दिशा देण्याचे काम आर्य समाजाने सातत्याने केले पाहिजे.” – ॲड. प्रकाश आर्य

 

पिंपरीतील मुख्य समारंभापूर्वी रविवारी सकाळी प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. गंगारामभाऊ म्हस्के यांच्या पुणे कॅम्प येथील ऐतिहासिक वाड्यापासून ते बुधवार पेठेतील तांबडी जोगेश्वरी परिसरातील भिडे वाड्यापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नलिनी देशपांडेदीप्ती विद्यार्थी यांनी केले, तर प्रा प्रास्ताविक व आभार प्रा. साईनाथ पुण्णे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उत्तम दंडीमे, दिनेश यादव, दिगंबर रिद्धीवाडे, संजीव भाट, ज्ञानेश्वर राणेवैशाली यादव यांनी परिश्रम घेतले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!