news
Home पिंपरी चिंचवड ‘गणेशोत्सवात नागरिकांची गैरसोय होऊ देणार नाही’; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाचा मोठा निर्णय!

‘गणेशोत्सवात नागरिकांची गैरसोय होऊ देणार नाही’; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाचा मोठा निर्णय!

विसर्जनानंतर परिसर तात्काळ स्वच्छ करण्याचे प्रशासनाचे निर्देश; अतिरिक्त स्वच्छता कर्मचाऱ्यांची शहरात तैनाती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

गणेशोत्सवासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका पूर्णपणे सज्ज; स्वच्छता, निर्माल्य संकलन अन् विसर्जन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. ०७ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: आगामी श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि गणेशमूर्ती विसर्जनासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाची विशेष आढावा बैठक पार पडली. या बैठकीत गणेशोत्सव काळात नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा आढावा उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी घेतला.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात ही बैठक संपन्न झाली. या वेळी सहायक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, राजू साबळे, सुधीर वाघमारे, महेश आढाव, अंकुश झिटे, राजेश भाट, अतुल सोनवणे, मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी बैठकीत स्पष्ट निर्देश दिले की, “गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आपापसात समन्वय ठेवून काम करावे. सार्वजनिक ठिकाणी, प्रमुख रस्त्यांवर, गणेश मंडळांच्या परिसरात तसेच विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांवर नियमित स्वच्छता राखण्यात यावी. विसर्जनस्थळी आवश्यक मनुष्यबळ, साधनसामग्री आणि स्वच्छता सुविधा वेळेत उपलब्ध करून दिल्या जाव्यात.”

गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरात ठिकठिकाणी पुरेशा प्रमाणात कृत्रिम जलकुंडांची उभारणी केली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात विसर्जनस्थळी जमा होणारे निर्माल्य संकलित करण्यासाठी विशेष निर्माल्य कुंड ठेवले जातील. हे निर्माल्य नियमितपणे उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी पथके तैनात करण्यात येणार आहेत. उत्सव काळात शहरात होणारी गर्दी लक्षात घेता स्वच्छता कर्मचाऱ्यांची अतिरिक्त तैनाती केली जाईल.

 

विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर कचरा साचणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. तसेच विसर्जन पार पडल्यानंतर संबंधित ठिकाणांची तातडीने स्वच्छता करून तो परिसर पूर्ववत स्वच्छ करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित गणेशोत्सवाचा अनुभव मिळावा यासाठी पालिका प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!