news
Home पिंपरी चिंचवड ‘संघटन सृजन अभियाना’तून काँग्रेसची नवी दिशा; नाशिकमध्ये ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांचे भव्य प्रशिक्षण शिबीर!

‘संघटन सृजन अभियाना’तून काँग्रेसची नवी दिशा; नाशिकमध्ये ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांचे भव्य प्रशिक्षण शिबीर!

राहुल गांधींकडून 'जागतिक राजकारण आणि भारत' विषयावर मार्गदर्शन; बूथ ते शहर पातळीवर पक्षाच्या मजबुतीसाठी कृती आराखडा तयार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

दिशा-कृतीदर्शक प्रशिक्षण शिबिराद्वारे काँग्रेसची सक्रिय सुरुवात; नव्या फळीवर संघटना बांधणीची मोठी जबाबदारी!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०७ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत महाराष्ट्रात नव्याने नियुक्त केलेल्या ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांचे १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबीर नाशिक येथील ग्रेप रिसॉर्ट (गंगापूर) येथे नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्र काँग्रेसने नवनिर्माण आणि परिवर्तनाची दिशा निश्चित करत संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे.
दिनांक २४ ऑगस्ट २०२६ ते ०२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या निवासी शिबिरामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचे काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) प्रशिक्षण विभागातर्फे आयोजित या शिबिरात राजकारण, काँग्रेसची विचारधारा, सर्वोदय मार्ग, जातिव्यवस्था व आरक्षण, थेट गाव भेट दौरा, काँग्रेसचा इतिहास, सांस्कृतिक व भाषेचे राजकारण, लिंगभाव, आर्थिक प्रश्न, शहरी राजकारण, फेसिझम व बहुसंख्यांकवाद, धर्मनिरपेक्षता, ‘विकसित भारत’चे वास्तव आणि नवनिर्माण कृती आराखडा या विषयांवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.
शिबिरादरम्यान प्रत्यक्ष गाव भेट दौरा आणि खड्डे खोदून मनरेगा योजनेतील जलसंवर्धनाचा उपक्रम प्रत्यक्ष कृतीतून राबवण्यात आला. गाव भेटीदरम्यान आलेल्या अनुभवांचे सर्व जिल्हाध्यक्षांनी एकत्र येत सादरीकरण केले.

या १० दिवसीय शिबिरात सचिन राव, खासदार एस्. सेंथिल, उल्हास पवार, उल्का महाजन, दीपक पवार, दीपा पवार, डॉ. नीरज हत्तेकर, वामशी रेड्डी, समीर शेख, लोकेश शेवडे, विश्वजीत कदम, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, के. राजू, विजय इंदर सिंगला, विजय वडेट्टीवार, के. कन्नन आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी शिबिरार्थींना मौलिक मार्गदर्शन केले.

शिबिराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी सर्व जिल्हाध्यक्ष व त्यांच्या कुटुंबीयांसमवेत आपुलकीने स्नेहभेट घेतली. त्यानंतर त्यांनी ‘जागतिक राजकारण आणि भारत’ या विषयावर सुमारे दोन तास संवाद साधला. तसेच शारीरिक व मानसिक सुदृढता, लक्ष आणि ध्यान यांचा परस्परसंबंध यावर मार्गदर्शन करत नवनिर्माणातून परिवर्तनाचा संदेश दिला. पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनीही आपल्या कुटुंबासह राहुल गांधी यांची सदिच्छा भेट घेतली.

“हे शिबिर नवा संकल्प, नवी दिशा, नवी दृष्टी आणि कृती कार्यक्रम देणारे ठरले आहे. या प्रशिक्षणाचा सकारात्मक परिणाम येत्या काळात संघटना बांधणी, आगामी निवडणुकांची तयारी आणि लोकप्रश्न सोडवणे या त्रिसूत्रीतून दिसून येईल. पक्षाची ध्येय-धोरणे, कार्यकर्त्यांची आचार-विचार संस्कृती, जनतेशी संवादाची पद्धत, बूथ ते शहर पातळीवरील कृती आराखडा आणि पुढील ३ ते ६ महिन्यांची ध्येयनिश्चिती या शिबिरातून शिकायला मिळाली,” अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी दिली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!