news
Home अमरावती मेगा ड्राईव्ह-१: अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम; ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण!

मेगा ड्राईव्ह-१: अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम; ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण!

सेमाडोहमध्ये घरभेटी, सर्वेक्षण अन् कायदेविषयक प्रबोधन; गरजू लाभार्थ्यांपर्यंत थेट कल्याणकारी योजना पोहोचवण्याचे कार्य वेगात | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह येथे १३ ‘नालसा’ योजनांची प्रभावी अंमलबजावणी; ग्रामस्थांच्या दारापर्यंत पोहोचल्या विधी सेवा व शासकीय योजना!

अमरावती, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. ०७ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज;

अमरावती: जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या (नालसा) ‘मेगा ड्राईव्ह-१’ उपक्रमांतर्गत चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम सेमाडोह गावातील नागरिकांच्या दारापर्यंत कायदेविषयक मार्गदर्शन, विधी सेवा आणि विविध शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचवला जात आहे. या उपक्रमामुळे दुर्गम भागातील ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून, थेट दारापर्यंत मिळणाऱ्या या सेवांबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
‘नालसा’च्या निर्देशानुसार महाराष्ट्रासह देशातील १८ राज्यांमध्ये हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाद्वारे या उपक्रमासाठी अमरावती जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या गरजू भागाचा प्राधान्याने विचार करून चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह गावाची निवड करण्यात आली आहे.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा उज्वला नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे यांच्या समन्वयातून २५ ऑगस्ट २०२६ पासून या मेगा ड्राईव्हची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. हा उपक्रम २३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत निरंतर सुरू राहणार आहे.
सेमाडोह येथे एकूण १३ ‘नालसा’ योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, कार्यालयीन कर्मचारी आणि पॅरा-लीगल स्वयंसेवक (PLVs) सेमाडोह गावाला नियमित भेटी देऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधत आहेत.

या विशेष मोहिमेत प्रमुख कामांवर भर दिला जात आहे.  गावातील प्रत्येक कुटुंबाची माहिती संकलित करून पात्र लाभार्थ्यांची ओळख पटवली जात आहे.  नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांची, कायद्यांची आणि मोफत विधी सेवांची सविस्तर माहिती दिली जात आहे.पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित शासकीय विभागांशी थेट समन्वय साधला जात आहे. या उपक्रमास सेमाडोहचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि चिखलदरा तालुका प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!