3
कामगारांच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा; वारसांना तातडीने अर्थसहाय्य द्या!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०८ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे/पिंपरी: पुणे आणि पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी कामगारांच्या अपघाती मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, हे प्रकार अत्यंत चिंताजनक व संतापजनक आहेत. कामगारांच्या सुरक्षिततेकडे अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित ठेकेदार, अधिकारी व कंपन्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच मृत कामगारांच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने आणि लाला राठोड यांनी केली आहे. या गंभीर विषयावर त्यांनी पुणे कामगार उपायुक्त अभय गीते यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि मागण्यांचे निवेदन सोपवले.
कामगार नेत्यांनी निवेदनाद्वारे अलीकडच्या काळातील विविध गंभीर दुर्घटनांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीवर स्वातंत्र्यदिनानिमित्त लावण्यात आलेली विद्युत रोषणाई काढताना छतावरून पडून राहुल विठ्ठल साबळे या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. निगडी येथील बीएसएनएल (BSNL) च्या मॅनहोल व डक्टमध्ये गुदमरून मनोज बाबुराव शिंदे आणि अमोल अशोक शिंदे या दोन कामगारांचा नाहक बळी गेला. आळंदी-धानोरे येथील कांगारू पॉलिमर्स प्रा. लि. कंपनीत ४ सप्टेंबर रोजी वेल्डिंगचे काम करत असताना उंचीवरून पडून अंकित कुमार वर्मा या कामगाराचा अपघाती मृत्यू झाला.
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील कार्यस्थळांवर आवश्यक सुरक्षा साधने (Safety Gear) आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा प्रचंड अभाव असल्याने कामगारांचे जीव धोक्यात येत असल्याबद्दल या वेळी तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली.
“कामगारांच्या जिवापेक्षा कोणतेही काम, दुरुस्ती किंवा उत्पादन महत्त्वाचे नाही. प्रत्येक कामगाराला सुरक्षित कार्यस्थळ, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, प्रशिक्षण आणि संरक्षणात्मक उपाययोजना मिळणे हा त्याचा कायदेशीर अधिकार आहे. या सर्व अपघातांची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि पीडित कुटुंबांना योग्य भरपाई मिळावी,” अशी आग्रही भूमिका कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी मांडली.
या सर्व प्रकरणांची गंभीर दखल घेत, “संबंधित विभागांकडे या दुर्घटनांबाबत कायदेशीर अहवाल व विचारणा मागवून नियमानुसार दोषींवर योग्य ती कडक कारवाई केली जाईल,” असे आश्वासन कामगार उपायुक्त अभय गीते यांनी निवेदनाचा स्वीकार करताना दिले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
