18
राज्यातील बंदरे व मत्स्यव्यवसाय विकासाला गती देण्यावर भर; मंत्री नितेश राणे यांनी घेतली ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट!
मुंबई/पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे , दि. ०८ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
मुंबई / पिंपरी: महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसायाला अधिक बळकटी देणे, मच्छीमार बांधवांचे प्रलंबित प्रश्न सोडवणे आणि सागरी बंदरांच्या विकासाला गती देण्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्वर ओक’ या मुंबईतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या वेळी राज्यातील मत्स्यव्यवसाय आणि बंदरांच्या सर्वांगीण विकासासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर विचारविनिमय झाला.
भेट प्रसंगी मंत्री नितेश राणे यांनी मुंबईतील ऐतिहासिक ससून डॉकच्या आधुनिकीकरणासंदर्भात मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध अद्ययावत उपाययोजनांची माहिती खासदार शरद पवार यांना दिली. तसेच, राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ या विशेष माहिती पुस्तिकेची प्रत शरद पवार यांना भेट देऊन मत्स्य व बंदरे विभागामार्फत घेण्यात आलेल्या धोरणात्मक आणि महत्त्वपूर्ण निर्णयांची सविस्तर माहिती दिली.
महाराष्ट्राच्या विस्तीर्ण सागरी किनाऱ्याचा विचार करता मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि मच्छीमार बांधवांच्या आर्थिक व सामाजिक सुरक्षिततेला प्राधान्य देणे, ही राज्य शासनाची मुख्य बांधिलकी असल्याचे मंत्री राणे यांनी या वेळी अधोरेखित केले.
या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान राज्यातील बंदरांचा विकास, मच्छीमारांचे कल्याण आणि सागरी अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या भविष्यातील रणनीतीवर अत्यंत सकारात्मक वातावरणात चर्चा पार पडली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

