21
प्राधिकरणातील जागेवर महापौर निवासस्थान नको; भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समितीचा विरोध, आंदोलनाचा इशारा!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दि. ०८ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / निगडी: निगडी प्राधिकरणातील महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखंडावर ‘महापौर निवासस्थान’ बांधण्यास नुकत्याच झालेल्या पालिका व स्थायी समितीच्या सभेत पाच कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, या निर्णयाला निगडी परिसरातील शिवप्रेमी, विविध सामाजिक संघटना आणि ‘भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समिती’ने तीव्र विरोध दर्शवला आहे. सदर जागेवर महापौर निवासस्थान न उभारता ते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारावे, अशी आग्रही मागणी करत शिवप्रेमींनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या संदर्भात भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समिती व शहरातील प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने महापौर रवि लांडगे, महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आणि शहर अभियंता मनोज सेठिया यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे विनंती केली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्राधिकरणातील या मोकळ्या भूखंडावर गेल्या अनेक वर्षांपासून ‘भक्ती-शक्ती शिवजयंती महोत्सव समिती’ आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य-दिव्य महानाट्य, व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय इतर अनेक महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम आणि भव्य सार्वजनिक उपक्रम याच जागेवर पार पडतात.
भक्ती-शक्ती समूह शिल्पाजवळ सार्वजनिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध असलेली ही एकमेव मोकळी जागा आहे. या परिसरात दुसरी कोणतीही पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने, ही जागा सर्वसामान्य नागरिकांच्या आणि शिवप्रेमींच्या उपक्रमांसाठी राखीव ठेवावी, अशी ठाम भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे.

महापौर निवासस्थानासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात योग्य जागेचा शोध घ्यावा, परंतु सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या प्राधिकरणातील या भूखंडावरील बांधकामाचा निर्णय तात्काळ रद्द करावा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सर्व धडक संघटनांच्या वतीने महापालिका प्रशासनाला देण्यात आला आहे.
या निवेदनावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, चेतन पवार, प्रकाश जाधव, कामगार नेते काशिनाथ नखाते, रोहिदास शिवणेकर, हौशेराव शिंदे, प्रबुद्ध कांबळे, सतीश काळे, वैभव जाधव, वसंत पाटील, सखाराम इक्के, आबासाहेब ढवळे यांच्यासह अनेक शिवप्रेमी व नागरिकांच्या सह्या आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
