19
गरजू व वंचित घटकांपर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचविण्यास प्राधान्य: महापौर रवि लांडगे; समाज विकास विभागाच्या कल्याणकारी योजनांच्या अर्ज प्रक्रियेचा धडक शुभारंभ!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०८ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड : महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या अर्ज स्वीकृती प्रक्रियेचा पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांच्या शुभहस्ते अत्यंत दिमाखात शुभारंभ करण्यात आला. शहरातील महिला, बालके, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि मागासवर्गीय घटकांतील प्रत्येक गरजू नागरिकापर्यंत पालिकेच्या योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने पोहोचवण्याचा ठाम निर्धार या वेळी महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केला. नागरिकांना अर्ज भरताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी महापौर लांडगे यांच्या पुढाकाराने ही अर्ज प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि लोकभिमुख करण्यात आली आहे.
शुभारंभ प्रसंगी बोलताना महापौर रवि लांडगे यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की, “अर्जातील किरकोळ त्रुटी किंवा तांत्रिक अडचणींमुळे एकही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहता कामा नये. ऑनलाईन अर्जासोबतच आवश्यकतेनुसार ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची सुविधाही उपलब्ध ठेवावी. विशेषतः डिजिटल माध्यमांचा वापर करताना अडचणी येणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बंधू-भगिनींना अर्ज भरण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी थेट मार्गदर्शन व मदत करावी.”
तसेच, नागरिकांना या कामासाठी महानगरपालिकेच्या कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, अशी शिस्तबद्ध प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
“महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक शेवटच्या घटकातील पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. माहितीचा अभाव किंवा तांत्रिक अडथळ्यांमुळे कोणताही नागरिक वंचित राहू नये, यासाठी संबंधित विभागांनी प्रभावी जनजागृती करावी. प्राप्त अर्जांवर वेळेत कार्यवाही करून गतिमानतेने लाभ वितरित करण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य राहील.”— रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
कार्यक्रमास उपस्थित महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी पठारे यांनी सांगितले की, महिला व बालकांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी पालिकेच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. महिला व बालकल्याण समिती आणि पालिका प्रशासन यांच्यात योग्य समन्वय ठेवून सर्व योजनांची तळागाळात प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.
या भव्य उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे, समिती सदस्या पल्लवी जगताप, रेशमा भुजबळ, निता पाडाळे, सुप्रिया चांदगुडे, सारिका मासुळकर, मनिषा लांडे, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त ममता शिंदे यांच्यासह समाज विकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सन २०२६-२७ या वर्षातील विविध योजनांसाठी पात्र नागरिकांनी विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज सादर करावेत आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कल्याणकारी योजनांचा पूर्ण लाभ घ्यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


