14
अमेरिका, रशिया आणि केनिया येथील उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा पीसीईटी ट्रस्टला शैक्षणिक दौरा; आंतरराष्ट्रीय सामंजस्य कराराबाबत चर्चा!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०८ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / निगडी: विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा शैक्षणिक अनुभव, उच्च शिक्षण, जागतिक पातळीवरील संशोधन आणि रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (PCET) ने परदेशातील नामांकित विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांशी संवाद अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून अमेरिका, रशिया आणि केनिया येथील उच्चस्तरीय शैक्षणिक शिष्टमंडळाने नुकतीच पीसीईटीच्या निगडी येथील मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
या आंतरराष्ट्रीय दौऱ्यात सहभागी झालेल्या प्रतिनिधींचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी मनापासून स्वागत केले. या प्रसंगी ट्रस्टच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
या अभ्यासू शिष्टमंडळामध्ये जगातील विविध नामांकित शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. अमेरिका मनरो युनिव्हर्सिटीच्या आग्नेय आशिया ऑपरेशन्स सहाय्यक संचालक आशा अलोशियस, रोचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे स्टुडंट सक्सेस अॅडव्हायझर विंचो चौहाई, सेंट लुईस युनिव्हर्सिटीचे युनिव्हर्सिटी रिलेशन्स ऑफिसर अभिनव भारद्वाज, मिडवे युनिव्हर्सिटीचे प्रादेशिक प्रतिनिधी रजत कुशवाह. रशिया कझान इनोव्हेटिव्ह युनिव्हर्सिटीच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे डेनिस कीको. केनिया लाईट अकादमीचे शाळा समुपदेशक पॉल. स्टडी मेट्रो संस्था स्टडी मेट्रोचे आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्स उपाध्यक्ष अभिनव बजाज, प्रादेशिक संचालक राज कपूर व पंकज चव्हाण.

या विशेष बैठकीत पीसीईटीच्या ‘सेंटर फॉर युरोपियन स्टडीज’च्या प्रमुख डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन यांनी पीसीईटीच्या शैक्षणिक उपक्रमांची, संशोधनातील देवाणघेवाणीची, संस्थात्मक भागीदारीच्या संधींची आणि संशोधन सहकार्याची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे (Presentation) मांडली.
शिष्टमंडळाच्या या भेटीदरम्यान अमेरिका, रशिया आणि केनियामधील विविध नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळणे, आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीच्या संधी उपलब्ध होणे आणि योग्य करिअरची निवड करणे याविषयी सखोल चर्चा झाली. याशिवाय, आगामी काळात या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत पीसीईटीचे शैक्षणिक आणि संशोधनविषयक सामंजस्य करार (MoU) करण्यावरही सकारात्मक विचारविनिमय झाला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
