20
हिंजवडीत बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या नायजेरियन महिलेवर पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडक कारवाई; केली मायदेशी हद्दपार!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०८ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / हिंजवडी: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या एका नायजेरियन महिलेचा शोध घेऊन तिला मायदेशी हद्दपार (Deport) करण्याची धडक कारवाई पोलीस प्रशासनाने केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परकीय नागरिक नोंदणी विभाग (विशेष शाखा-२) कडून ही यशस्वी कारवाई करण्यात आली.
परकीय नागरिक नोंदणी विभागाला हिंजवडी परिसरात एक परदेशी महिला बेकायदेशीरपणे राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार विशेष शाखेने या परदेशी महिलेची कसून चौकशी केली असता, तिच्याकडे कोणताही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा उपलब्ध नव्हता. त्यामुळे पोलिसांनी DPM System (डीपीएम सिस्टीम) वर तिची ऑनलाईन बायोमेट्रिक पडताळणी केली.
या पडताळणीदरम्यान सदर महिलेचे नाव गिफ्ट ओकोह (GIFT OKOH) असून ती नायजेरिया देशाची नागरिक असल्याचे निष्पन्न झाले. ही महिला २३ सप्टेंबर २०१४ रोजी वैद्यकीय (मेडिकल) व्हिसावर भारतात आली होती. सुरुवातीला ती जयपूर आणि पालघर येथे वास्तव्यास होती. त्यानंतर २०२४ पासून पासपोर्ट आणि व्हिसाची मुदत संपलेली असतानाही ती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात बेकायदेशीररीत्या लपून राहत असल्याचे तपासात उघडकीस आले.
वैध कागदपत्रे नसलेल्या या महिलेला तिच्या मूळ देशात पाठवण्यासाठी विशेष शाखेने तातडीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. नायजेरियन हाय कमिशन, नवी दिल्ली यांच्याकडून तिचे ‘इमर्जन्सी ट्रॅव्हल डॉक्युमेंट’ (Emergency Travel Document) आणि FRRO मुंबई कार्यालयाकडून ‘एक्झिट परमिट’ (Exit Permit) प्राप्त करण्यात आले.
सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर मंगलवार, दि. ०८ सप्टेंबर २०२६ रोजी सदर नायजेरियन महिलेला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थेट नायजेरिया देशात डिपोर्ट (हद्दपार) करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह-आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) डॉ. बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त (विशेष शाखा) धीरज पाटील, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
कारवाईत विशेष शाखा-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नरावाड, परकीय नागरिक नोंदणी विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक राजश्री पावरा, श्रेणी पोलीस उप-निरीक्षक शेख, महिला पोलीस हवालदार खोमणे, पोलीस शिपाई अक्षय घोडमारे आणि पोलीस शिपाई पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांचा असाच शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई सत्र सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
