33
पिंपरी-चिंचवडसाठी शाश्वत विकासाचे मॉडेल उभे करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे उद्दिष्ट कौतुकास्पद: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ०९ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “पिंपरी-चिंचवड हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर आशिया खंडातील एक अत्यंत वेगाने विकसित होणारे आणि नावाजलेले शहर आहे. शहरातील पायाभूत सुविधा आणि नागरी सोयी-सुविधा अत्यंत उल्लेखनीय आहेत. या विकासाला भविष्यातील गरजा आणि वाढत्या शहरीकरणाची सांगड घालून पिंपरी-चिंचवडच्या सूक्ष्म व नियोजनबद्ध विकासाचे मॉडेल तयार करण्याचे उद्दिष्ट आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी समोर ठेवले आहे. या उद्दिष्टाच्या दिशेने ते निश्चितपणे यशस्वी वाटचाल करतील,” असे गौरव उद्गार महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काढले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा ‘मराठी पत्रकार संघाच्या’ वतीने विशेष नागरी सन्मान करण्यात आला. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या वतीने आयोजित या सन्मान सोहळ्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या दिमाखदार सोहळ्यास आमदार अमित गोरखे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे, ‘दैनिक पुढारी’चे संपादक सुनील माळी, ‘लेट्स अप मराठी’चे संपादक योगेश कुटे, ‘सकाळ माध्यम समुहा’च्या सहसंपादिका मृणालिनी नानिवडेकर यांच्यासह विविध वृत्तपत्रांचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहुल नार्वेकर पुढे म्हणाले की, पूर्वी गावाच्या स्वरूपात असलेल्या या परिसराने गेल्या काही दशकांत घेतलेली महाकाय झेप ही संपूर्ण आशियासाठी एक उत्तम उदाहरण आहे. शहराच्या विकासाची प्रक्रिया ही केवळ सिमेंट-काँक्रिटपुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणारी असावी आणि ते काम महापालिका प्रशासनाकडून उत्तम प्रकारे होत आहे.

सन्मानाला उत्तर देताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले:
“पत्रकारांनी प्रशासनाला नेहमी आरसा दाखवण्याचे काम केले पाहिजे आणि प्रशासनाने त्या आरशात दिसणारा चेहरा सुधारला पाहिजे. प्रसारमाध्यमांनी केलेली टीका ही प्रशासकीय कामातील त्रुटी सुधारण्याची संधी असते. पिंपरी-चिंचवड शहराने मला आपल्यात सामावून घेतले असून, शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन.”— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
या वेळी संगणकीय सादरीकरणाद्वारे (PPT Presentation) आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहराच्या भवितव्याची ब्लूप्रिंट मांडली. पुढील ५० वर्षांसाठी पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन, उंचावरील पाणीसाठे, पवना व इंद्रायणी नदीकाठ विकास प्रकल्प (Riverfront Development) आणि ड्रेनेज मास्टर प्लॅन. पुढील २५ वर्षांसाठी शाश्वत घनकचरा व्यवस्थापन, डीपी रस्ते, नाले सुधारणा प्रकल्प, डेटा सेंटर धोरण आणि नवीन पार्किंग धोरण. दिव्यांगांसाठी रोजगार निर्मिती, ‘स्वाभिमान धोरण’ (स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी), ‘ऑपरेशन कायापालट’ अंतर्गत स्वच्छता गृह धोरण, भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्रे, अद्ययावत अभ्यासिका, व्यायामशाळा आणि सेवानिवृत्तीच्याच दिवशी पेन्शन योजना.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
