44
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०९ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि अथांग उत्साहाचा सण आहे. मात्र, उत्सवाचा आनंद द्विगुणित करतानाच पर्यावरण संवर्धन आणि शहराच्या स्वच्छतेची नैतिक जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारावी. गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतीने साजरा करण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त पर्यावरणस्नेही पर्यायांचा स्वीकार करावा,” असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने नागरिकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, शाडू मातीच्या व नैसर्गिक रंगांच्या मूर्तींनाच प्राधान्य देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (PoP) मूर्तींचा वापर टाळावा. श्रींच्या मूर्तींचे विसर्जन नदी, नाले अथवा तलावांसारख्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये न करता, महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम हौद व जलकुंडांमध्येच करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
उत्सवादरम्यान तयार होणारे निर्माल्य नद्यांमध्ये न टाकता महापालिकेच्या ‘निर्माल्य संकलन केंद्रात’ स्वतंत्रपणे जमा करावे. तसेच ओला, सुका व विशेष कचरा वेगळा करून तो महापालिकेच्या कचरा संकलन गाडीकडे सोपवावा.
“गणेशोत्सवाची परंपरा, श्रद्धा आणि उत्साह कायम ठेवताना पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शाडूच्या मूर्ती, नैसर्गिक सजावट आणि कृत्रिम विसर्जन व्यवस्थांचा वापर करून नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला हातभार लावावा. नागरिकांच्या सहभागातूनच स्वच्छ, सुंदर व शाश्वत शहराचा संकल्प पूर्ण होईल.”— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
घरगुती व सार्वजनिक मंडपांच्या सजावटीसाठी घातक थर्माकोल व प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळून कागद, कापड आणि नैसर्गिक साहित्याचा वापर करावा. विजेची बचत करण्यासाठी एलईडी (LED) दिव्यांचा वापर करावा आणि ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावेत, असे आवाहन आरोग्य व कचरा व्यवस्थापन विभागाचे उप-आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी केले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही केवळ संकल्पना न राहता नागरिकांच्या प्रत्यक्ष कृतीतून साकार व्हावी, यासाठी पालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
