70
निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय नको; सचिन काळभोर यांना स्वीकृत नगरसेवक पदावर संधी देण्याची भाजप कार्यकर्त्यांची आग्रही मागणी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०९ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / भोसरी: भारतीय जनता पक्षासाठी (भाजप) वर्षानुवर्षे निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना भोसरी विधानसभेतून समोर येत आहे. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार एकनाथ पवार यांचा जाहीर प्रचार केला म्हणून पक्षाशी निष्ठा राखणाऱ्या सचिन काळभोर या कार्यकर्त्याला डावलले जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पक्ष आणि पक्षश्रेष्ठींनी निष्ठावंत कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावर सचिन काळभोर यांची नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
सन २०१४ च्या भोसरी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून एकनाथ पवार यांनी पक्षाचे अधिकृत तिकीट घेऊन निवडणूक लढवली होती. त्यावेळी निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून सचिन काळभोर यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा प्रामाणिकपणे व जाहीर प्रचार केला होता. त्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार महेश लांडगे निवडून आले. त्यानंतर सन २०१७ मध्ये महेश लांडगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये प्रवेश केला.
दुसऱ्या बाजूला, पक्षाचे माजी पक्षनेते एकनाथ पवार यांनी २०२४ च्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून लोहा-कंधार मतदारसंघातून निवडणूक लढवली व नुकताच पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. अशा प्रकारे इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांचा पुनर्जन्म होत असताना, पक्षाचा अधिकृत प्रचार करणाऱ्या आणि सातत्याने भाजपचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्या सचिन काळभोर यांच्यासारख्या मूळ व निष्ठावंत कार्यकर्त्याला मात्र स्वकीयांकडूनच विरोधाचा सामना करावा लागत आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी स्वीकृत नगरसेवक पदासाठी सचिन काळभोर हे इच्छुक आहेत. मात्र, जुन्या आणि पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक वागणूक न देता, खुनशी राजकारणातून त्यांना डावलले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
“सन २०१४ मध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार करणे हा माझा गुन्हा होता का? पक्ष संकटात असताना आम्ही तत्त्वांशी आणि पक्षाशी प्रामाणिक राहिलो. आज पक्षश्रेष्ठींनी माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहणे काळाची गरज आहे, जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश जाऊन पक्षाची प्रतिमा अधिक उंचावेल.”— सचिन काळभोर, निष्ठावंत कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टी
भारतीय जनता पक्षाची पायाभरणी करणाऱ्या आणि पडत्या काळातही पक्षाचा विचार तळागाळात पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखणे हीच भाजपची खरी ताकद राहिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन, सचिन काळभोर यांच्यावर होणारा अन्याय दूर करावा आणि त्यांना स्वीकृत नगरसेवक पदावर संधी देऊन योग्य तो सन्मान मिळवून द्यावा, अशी तीव्र भावना भोसरी मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
