news
Home पिंपरी चिंचवड ‘अपात्र ठरलेल्या एकाही गरजू महिलेवर अन्याय होऊ देणार नाही’; राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे आश्वासन!

‘अपात्र ठरलेल्या एकाही गरजू महिलेवर अन्याय होऊ देणार नाही’; राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे आश्वासन!

कष्टकरी संघर्ष महासंघाच्या पाठपुराव्याला यश; निराधार व कामगार महिलांना योजनेत प्राधान्य देण्याची काशिनाथ नखाते यांची मागणी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘लाडक्या बहिणीं’साठी सरकार सकारात्मक निर्णय घेईल: राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १० सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आलेल्या राज्यातील ९२ लाखांहून अधिक महिलांच्या प्रश्नाबाबत राज्य सरकार अत्यंत सकारात्मक असून, लवकरच यावर योग्य आणि सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले आहे.
कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने १ सप्टेंबर रोजी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर ‘लाडक्या बहिणींचा आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. या आंदोलनाची राज्य सरकारने तातडीने दखल घेत महासंघाच्या शिष्टमंडळाला मंत्रालयात चर्चेसाठी आमंत्रित केले होते. या बैठकीत राज्यमंत्र्यांनी महासंघाच्या मागण्या ऐकून घेत महिलांना दिलासा देण्याचे संकेत दिले.

या बैठकीदरम्यान कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने राज्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे होत्या:
 तांत्रिक कारणांमुळे अथवा e-KYC न झाल्याने योजनेपासून वंचित राहिलेल्या गरजू महिलांना पुन्हा अर्जाची संधी द्यावीनिराधार, विधवा आणि परित्यक्त्या महिलांसाठी मदतीच्या रकमेत वाढ करण्यात यावी. असंघटित क्षेत्रातील कष्टकरी व कामगार महिलांचा योजनेत प्राधान्याने समावेश करावा. या बैठकीस कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, निमंत्रक सखाराम केदार, चेतन गायकवाड आणि संजय शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले:
“लाडकी बहीण योजनेतील मिळणाऱ्या आर्थिक लाभावर अनेक महिलांनी आपल्या कुटुंबाचे वर्ष-दोन वर्षांचे आर्थिक नियोजन केले होते. मात्र, अचानक ९२ लाख महिला अपात्र ठरल्याने हे नियोजन कोलमडले आहे. हा केवळ एका योजनेचा विषय नसून गरजू महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा आणि सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे. सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे आशेचा किरण दिसला असला, तरी राज्यातील एकही पात्र व कष्टकरी महिला या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी महासंघाचा लढा व पाठपुरावा यापुढेही सुरूच राहील.”
काशिनाथ नखाते, अध्यक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ.
शासनाने दिलेल्या या सकारात्मक आश्वासनामुळे राज्यातील लाखो अपात्र ठरलेल्या महिलांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!