16
कर्ज देण्याच्या आमिषाने ६० ते ७० म्यूल खाती उघडून करोडो रुपयांची सायबर फसवणूक; गोवा अन् कोलकात्यातून दोघांना सायबर पोलिसांकडून अटक!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दि. १० सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / चिंचवड”: कर्ज (Loan) देण्याचे आमिष दाखवून सामान्य नागरिकांची बँक खाती (Mule Accounts) उघडून त्यावर सायबर फसवणुकीतील करोडो रुपये स्वीकारणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्याने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गोवा आणि कोलकाता येथून दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी ६० ते ७० बनावट बँक खात्यांचा वापर करून देशभरातील सायबर फसवणुकीतील कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
एका खाजगी कंपनीतील मॅनेजर असलेल्या फिर्यादींना आरोपींनी परदेशी शेअर मार्केट, स्टॉक मार्केट आणि आयपीओ (IPO) मध्ये गुंतवणूक केल्यास तब्बल ५०० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पडून फिर्यादींनी विविध टप्प्यांत ८३ लाख ८० हजार रुपये गमावले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून गु.र.नं. ३७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार (IT Act) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सायबर पोलिसांच्या पथकाने फिर्यादींच्या बँक व्यवहारांची कसून तपासणी केली असता २१ मार्च २०२६ रोजी ३० लाख रुपयांची रक्कम सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील ‘शिवशक्ती एंटरप्रायझेस’ या नावाने असलेल्या खात्यात जमा झाल्याचे दिसले. हे खाते गोव्यातील अभिकेष मोहन आचरेकर आणि प्रतीक्षा नाईक यांच्या भागीदारीत होते.
आरोपी अभिकेष सातत्याने आपले ठिकाण बदलत होता. दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी तो पुण्यात आल्याची खबर मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे यांच्या पथकाने खेड शिवापूर येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने कोलकाता येथील साथीदार अनमोल शर्मा याच्या मदतीने सायबर गुन्ह्यांतील पैसे स्वीकारल्याची कबुली दिली.
पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी अभिकेष आचरेकर हा गोव्यातील सामान्य नागरिकांना, विशेषतः महिलांना कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या नावे तब्बल ६० ते ७० बँक खाती (Mule Accounts) उघडत असे. ही खाती तो कोलकाता येथील अनमोल शर्मा याला पुरवत असे, ज्याचा वापर सायबर फसवणुकीतील कोट्यवधी रुपये स्वीकारण्यासाठी केला जात होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे यांच्या पथकाने तातडीने कोलकाता (पश्चिम बंगाल) गाठून तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने अनमोल शर्मा याला अटक केली. हे आरोपी पुणे शहर आणि राजस्थान येथील सायबर गुन्ह्यांमध्येही पोलीस दप्तरी हवे होते.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१) अभिकेष मोहन आचरेकर (वय ३४ वर्षे, रा. गोवा) , २) अनमोल शर्मा (वय ३२ वर्षे, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल)
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह-पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त (सायबर व आर्थिक गुन्हे) रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे, सागर पोमण, रोहित डोळस, विद्या पाटील आणि सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
