11
सामाजिक कार्यकर्ते आणि ‘वृक्षमित्र’ प्रवीण वासनिक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी अमरावतीत साजरा!
अमरावती, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. १० सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: “मनुष्याचे जीवन अतिशय दुर्मिळ असून मिळालेल्या आयुष्यात आपण समाजासाठी काहीतरी चांगले कार्य केले तर त्याचा आनंद स्वतःसोबतच इतरांनाही होतो. विचारांनुसार माणूस कृती करत असतो, त्यामुळे ज्या कार्यात समाजाचे कल्याण आहे असे काम प्रत्येकाने केले तरच समाजाचे नंदनवन होईल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. गोविंद कासट यांनी केले.
सर्वांगीण ग्रामीण विकास प्रशिक्षण संस्थेचे व विचाररत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल वाचनालयाचे अध्यक्ष, जिल्हा सेवा पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते आणि ‘वृक्षमित्र’ प्रवीण वासनिक यांचा वाढदिवस बुद्ध टेकडी मित्र मंडळींच्या वतीने एसआरपीएफ चांदूर रोड येथील निसर्गाच्या सानिध्यात विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून डॉ. गोविंद कासट बोलत होते.
कंक्रीटच्या जंगलात वृक्षारोपण व संवर्धनाचे काम अत्यंत अल्प होत असल्याने भविष्यात मानवाला गंभीर परिणाम भोगावे लागतील. हीच गोष्ट ध्यानात घेऊन ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत आणत प्रवीण वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त बुद्ध टेकडी परिसरात मान्यवरांच्या हस्ते ८ फूट उंचीच्या ६ बोधीवृक्ष रोपट्यांचे रोपण करण्यात आले. तसेच गाजर गवत निर्मूलन, जनजागृती पत्रके आणि मानवी जीवनात विपश्यनेचे महत्त्व सांगणाऱ्या माहिती पत्रकांचे उपस्थितांना वाटप करण्यात आले.
सुरुवातीला महाकारुणिक भगवान बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्राचार्य डॉ. संजय खडसे यांनी प्रास्ताविक करताना प्रवीण वासनिक यांनी चालवलेली वृक्षारोपण चळवळ, गाजर गवत निर्मूलन, ग्रंथालय चळवळ, भारतातील पहिली मुलींची शाळा राष्ट्रीय स्मारक व्हावी यासाठीचा पाठपुरावा आणि सम्राट अशोकांची जयंती देशभर सुरू व्हावी यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला. या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रवीण वासनिक यांचा शाल व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी ‘कोण बनेल करोडपती’ (KBC) मध्ये सहभागी झालेल्या प्रगती दिनेश कल्पेकर आणि ‘दैनिक हिंदुस्थान’चे स्तंभलेखक डॉ. रमेश गोखडे यांचा मान्यवरांच्या हस्ते बोधीवृक्ष रोपटे, शाल व पुस्तक देऊन विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घटना समितीमधील शेवटचे भाषण हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.
या सोहळ्यास माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, वरिष्ठ विपश्यना आचार्य ॲड. उमाताई मुंदडा, आय.ए.एस. मिशनचे संचालक डॉ. नरेशचंद्र काठोळे, मनपाच्या माजी सभापती प्रभाताई आवारे, माजी सरपंच कमलताई वासनिक, माजी मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, निवृत्त उपसचिव सुनील बसवंत, हर्षल बन्सोड, कैलास वाकोडे, सुरेश वधे, सुरेश वानखडे, अशोक इंगळे, नरेंद्र सोमकुंवर, गोपाळराव वधे, बी.टी. वानखडे, राजू चोरपगार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्राचार्य डॉ. संजय खडसे यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

