9
कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १० सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: कामगार आणि श्रमिकांच्या हक्कासाठी गेल्या ३५ वर्षांपासून सातत्याने संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा मराठी पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते (दि. ८) स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या सभासदांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या जल्लोषात आनंद व्यक्त केला.
मराठी पत्रकार संघाच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहामध्ये या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.
कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ कष्टकरी, कामगार आणि श्रमिकांच्या हक्कासाठी, न्याय्य मागण्यांसाठी आणि सुरक्षिततेसाठी लढा दिला आहे. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यभरातील कामगार वर्गात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. कामगार आणि व्यवस्थापनामध्ये समन्वय साधत कर्मचाऱ्यांना कायदेशीर हक्क व योग्य वेतन मिळवून देण्यासाठी त्यांनी घेतलेले श्रम हे कामगार चळवळीसाठी प्रेरणादायी ठरले आहेत.
“हा बहुमोल पुरस्कार माझ्या आयुष्यातील अत्यंत आठवणीत राहणारा आणि प्रदीर्घ संघर्षाची पावती देणारा क्षण आहे.”— यशवंतभाऊ भोसले, संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय श्रमिक आघाडी.
या वेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे यांनी यशवंतभाऊ भोसले यांच्या कार्याचे कौतुक केले.
तसेच सोहळ्यात राजकीय संपादिका (मुंबई) मृणालिनी नानिवडेकर, दै. पुढारीचे संपादक सुनील माळी, न्यूज १८ मराठीचे सहसंपादक विशाल परदेशी, सकाळ पुणेचे ज्येष्ठ पत्रकार राज काची आणि लेटसअप पुणेचे संपादक योगेश कुटे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची ‘आमदारांचे हेडमास्टर’ या विषयावर प्रकट मुलाखत घेतली, ज्याला उपस्थितांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
या सोहळ्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, एस. एम. बी. पी. स्कूलचे चेअरमन डॉ. डी. के. भोसले, ऑटो संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे, दान से उडानचे संस्थापक रवी घाटे, आवटी ग्रुपचे चेअरमन बाबासाहेब आवटी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष किरण जोशी, प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार आणि प्रदेश सचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांनी नेटके नियोजन केले होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
