68
किवळे गृहप्रकल्पातील ७५५ लाभार्थ्यांच्या मुद्रांक शुल्क सवलतीबाबत लवकरच निर्णय: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे!
पिंपरी / मुंबई प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १० सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / मुंबई: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रावेत येथील गृहप्रकल्प रद्द झाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी किवळे येथे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पातील ७५५ लाभार्थ्यांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते काशिनाथ नखाते पुन्हा एकदा सामान्य नागरिकांच्या मदतीला धावून आले आहेत. किवळे गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांना मुद्रांक शुल्क माफ करणे आणि ‘प्रधानमंत्री आवास योजने’तून अनुदान मिळवून देणे यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत “शुल्क सवलतीबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल,” असे स्पष्ट आश्वासन दिले आहे.
किवळे गृहप्रकल्पातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रशासकीय व आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. या गरीब व कष्टकरी लाभार्थ्यांना मुद्रांक शुल्कामध्ये पूर्ण सवलत मिळावी, यासाठी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची भेट घेऊन यापूर्वी सविस्तर चर्चा केली होती.
या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज मुंबई विधानभवनातील आपल्या दालनात उच्चस्तरीय बैठक आयोजित केली. या बैठकीत त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी थेट संवाद साधून ७५५ लाभार्थ्यांना सवलत देण्याबाबत अधिकृत शिफारस पत्र सोपवले.
बैठकीनंतर कामगार नेते काशिनाथ नखाते आणि गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांच्या शिष्टमंडळाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. या वेळी काशिनाथ नखाते यांनी अत्यंत अभ्यासूपणे ७५५ लाभार्थ्यांच्या अडचणी आणि कायदेशीर बाबी मंत्र्यांसमोर मांडल्या.
“अनेक वर्षांपासून घराचे स्वप्न पाहणारे हे लाभार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कष्टकरी वर्गातील आहेत. रावेतचा प्रकल्प रद्द झाल्याने आधीच या कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे किवळे प्रकल्पात त्यांना मुद्रांक शुल्कात सवलत आणि पीएमएवाय (PMAY) अंतर्गत अनुदान मिळणे हा त्यांचा हक्क आहे. सरकार जोपर्यंत अंतिम निर्णय घेत नाही, तोपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील.”— काशिनाथ नखाते, अध्यक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ.
या वेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे उपाध्यक्ष राजेश माने, चेतन गायकवाड, सखाराम केदार, अनिल चौरे, अंगद मुंगळे, विष्णू माने, संजय शिंदे, संदीप कांबळे, तसेच महिला प्रतिनिधी गीता नागपुरे, शुभांगी चव्हाण, अश्विनी जायगुडे, धनश्री कोरे, पूजा निकम, आशा जाधव, प्रीती गोहाड आणि गृहप्रकल्पातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कष्टकरी, कामगार आणि उपेक्षित घटकांच्या न्याय्य हक्कासाठी सदैव रस्त्यावर उतरून अन् शासनस्तरावर पाठपुरावा करून प्रश्न तडीस नेणाऱ्या कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या या धडक प्रयत्नांमुळे किवळे प्रकल्पातील ७५५ कुटुंबांच्या आशेचा किरण अधिक तीव्र झाला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
