14
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायण भागवत ७९ व्या वर्षात पदार्पण; सांगवीतील विविध संस्था-संघटनांच्या वतीने विशेष सन्मान!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी सुनील पोखरे, दि. १० सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / सांगवी: सांगवी व नवी सांगवी परिसरातील विविध सामाजिक संघटना, युग प्रवर्तक संघ, सुभेदार रामजी आंबेडकर वाचनालय, सांगवी विकास मंच, बारामती मित्र मंडळ आणि ओ.बी.सी. संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. नारायण शंकरराव भागवत यांचा ग्रंथ भेट देऊन भावूक वातावरणात विशेष सन्मान करण्यात आला.
नारायण भागवत यांनी नुकतीच वयाची ७८ वर्षे पूर्ण करून ७९ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या स्नेहमयी वंदनाचा कार्यक्रम नवी सांगवी येथील साई चौक येथे बुधवार, दिनांक ०९ सप्टेंबर रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी युग प्रवर्तक संघाचे सचिव मगन सावंत यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. “नारायण भागवत यांनी सामाजिक क्षेत्रात दिलेल्या प्रदीर्घ सहकार्याचा आणि मार्गदर्शनाचा समाजाला मोठा फायदा झाला आहे. त्यांचे प्रत्येक विषयातील प्रबोधन अत्यंत प्रभावी आणि दिशादर्शक असते,” असे मगन सावंत यांनी मनोगतात व्यक्त केले.
या सोहळ्यात सांगवी पंचक्रोशीतील ज्येष्ठ प्रवचनकार ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज, नाबार्ड बँकेतील सेवानिवृत्त अधिकारी व प्रवचनकार ह.भ.प. बबनराव सोनवणे साहेब, सांगवी विकास मंचचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण गिरगुने, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते भरतशेठ कुंभार, सांगवी विकास मंचचे अध्यक्ष महेशशेठ भागवत आदी मान्यवरांनी नारायण भागवत यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला व त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना नारायण भागवत यांनी सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.

या प्रसंगी साहित्यिक मुरलीधर दळवी, श्रीपती कोंडे, देशमुख साहेब, तसेच बारामती मित्र मंडळ, बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर संयुक्त जयंती समिती, युग प्रवर्तक संघ, सुभेदार रामजी आंबेडकर वाचनालय व सांगवी विकास मंचचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सचिव मगन सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
