news
Home पिंपरी चिंचवड ‘कर्ज अन् कौटुंबिक अडचणींना कंटाळून तरुणाची आत्महत्या’; स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हळहळ!

‘कर्ज अन् कौटुंबिक अडचणींना कंटाळून तरुणाची आत्महत्या’; स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हळहळ!

नवी पेठेत MPSC परीक्षार्थीने संपवले जीवन; पोलिसांना सापडली दोन पानांची सुसाईड नोट, १९ जणांची चौकशी होणार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पुण्यात अडीच लाखांच्या कर्जापायी MPSC च्या २४ वर्षीय परीक्षार्थीची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये १९ जणांची नावे!

पुणे/पिंपरी प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ११ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांची तयारी करणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणाने अडीच लाख रुपयांच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. प्रथमेश देशमुख असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी परीक्षार्थीचे नाव असून, त्याने आत्महत्येपूर्वी दोन पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. यामध्ये तब्बल १९ जणांची नावे आणि घेतलेल्या व परत केलेल्या पैशांचा सविस्तर तपशील नमूद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश देशमुख हा मध्य पुण्यातील नवी पेठ भागात एका भाड्याच्या खोलीत राहून स्पर्धा परीक्षांचा (MPSC) अभ्यास करत होता. कौटुंबिक आर्थिक अडचणी आणि त्यातच विविध लोकांकडून घेतलेले सुमारे २.५० लाख रुपयांचे कर्ज यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होता. अखेर या आर्थिक विवंचनेला कंटाळून त्याने राहत्या खोलीत टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून पोलिसांना दोन पानांची सुसाईड नोट हस्तगत झाली आहे.
“प्रथमेशवर सुमारे २.५० लाख रुपयांचे कर्ज होते. त्याच्या सुसाईड नोटमध्ये १९ लोकांची नावे असून त्याने कोणाकडून किती पैसे घेतले आणि किती परत केले, याचा संपूर्ण हिशोब लिहून ठेवला आहे. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही बिकट होती. त्याने एवढे कर्ज नेमक्या कोणत्या कारणासाठी घेतले होते, याबाबत त्याच्या नातेवाइकांची चौकशी सुरू आहे.”
ऋषिकेश रावले, पोलीस अधिकारी.

पोलीस प्रशासनाने प्रथमेशचा मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी (Post-Mortem) पाठवला आहे. या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सुसाईड नोटमध्ये नाव असलेल्या १९ जणांचा या प्रकरणात काय संबंध आहे आणि त्यांच्याकडून प्रथमेशवर पैसे वसुलीसाठी मानसिक दबाव आणला जात होता का, या दिशेने विश्रामबाग पोलीस अधिक तपास करत आहेत.
MPSC ची तयारी करणाऱ्या तरुण परीक्षार्थीने अशा प्रकारे जीवन संपवल्यामुळे पुणे शहरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!