35
विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा धडा; मानवी साखळीतून भोसरी येथे जनजागृती!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे दि. ११ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / भोसरी: गणेशोत्सवाचा उत्साह शहरभरात ओसंडून वाहत असताना, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक ५ मधील एसपीजी इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (आळंदी रोड, भोसरी) येथील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा मोठा धडा नागरिकांना दिला आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने पर्यावरणपूरक गणेश प्रतिमा तयार करून आणि रस्त्यावर मानवी साखळी उभारून नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत प्रभावी जनजागृती केली.
हा उपक्रम महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माझी वसुंधरा ७.०’ व ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ अभियानांतर्गत राबविण्यात आला.
गणेशोत्सव साजरा करताना प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळावा, नैसर्गिक व पर्यावरणपूरक सजावटीला प्राधान्य द्यावे आणि परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन विद्यार्थ्यांनी फलक हातात धरून व घोषणा देऊन केले. या वेळी उपस्थित शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी ‘हरित शिक्षक शपथ’ घेतली आणि स्वच्छतेच्या घोषणांनी भोसरी परिसर दुमदुमून सोडला.
“गणेशोत्सवाची भक्ती आणि उत्साह कायम ठेवत पर्यावरणाचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जाणीव निर्माण झाल्यास हा संदेश थेट त्यांच्या कुटुंब आणि समाजापर्यंत पोहोचतो. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी पुढे यावे.”— डॉ. प्रदीप ठेंगल, उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.
शालेय विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे भोसरी परिसरातील नागरिकांमधून कौतुक होत असून, यंदाचा गणेशोत्सव स्वच्छ आणि पर्यावरणपूरक साजरा करण्याचा संकल्प नागरिकांनी केला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
