26
पिंपरी-चिंचवडमध्ये गणेशोत्सवाची जय्यत तयारी; १११ गणेश मंडळांना परवाने तर १०४ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ११ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरभरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून शहरातील १११ गणेश मंडळांना अधिकृत परवाने देण्यात आले आहेत. तसेच, गणेश भक्तांच्या सोयीसाठी आणि सुरक्षित, पर्यावरणपूरक विसर्जनासाठी शहरात १०४ ठिकाणी विसर्जन व्यवस्था उभारण्यात आली आहे.
महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार विविध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मंडळांना परवाने देण्यात आले आहेत.
-
गणेश मंडळ परवाने (एकूण १११): ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय २३, ‘क’ २, ‘ड’ १६, ‘इ’ १५, ‘फ’ १७, ‘ग’ २०, ‘ह’ १५, ‘ज’ २ आणि ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १ अशा एकूण १११ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे.
-
विसर्जन ठिकाणे (एकूण १०४): ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय १०, ‘ब’ १४, ‘क’ १२, ‘ड’ १२, ‘इ’ १३, ‘फ’ ११, ‘ग’ ६, ‘ह’ १२, ‘ज’ ९ आणि ‘ल’ ५ अशा एकूण १०४ विसर्जन ठिकाणांची नेटकी व्यवस्था करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणतीही असुविधा होऊ नये आणि प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम तलाव व विसर्जन कुंड उभारण्यावर भर देण्यात आला आहे.
“गणेशोत्सव हा आपल्या शहरातील नागरिकांच्या श्रद्धा आणि उत्साहाचा सण आहे. हा उत्सव आनंदमय, शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून आवश्यक सर्व नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करून प्रशासनास सहकार्य करावे.”— रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.
“गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. १०४ विसर्जन स्थळांवर पुरेशा नागरी सुविधा, प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित आणि पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा.”— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
