25
मालमत्ता कर वसुलीला गती देऊन थकबाकीदारांवर नियोजनबद्ध कारवाई करा: अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ११ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने १३०० कोटी रुपयांचे मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी थकबाकीदारांवर नियोजनबद्ध पद्धतीने कडक कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिले आहेत. विशेषतः बिगरनिवासी व औद्योगिक मालमत्तांच्या थकबाकी वसुलीला प्राधान्य देत स्वतंत्र वसुली पथके तयार करून कारवाईची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार, मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात कर आकारणी व कर संकलन विभागाची आढावा बैठक पार पडली. या वेळी उपायुक्त सचिन पवार यांच्यासह सर्व १८ क्षेत्रीय कार्यालयांतील मंडल अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त सांडभोर यांनी स्पष्ट केले की, ज्या मालमत्ताधारकांना बिले बजावूनही अद्याप कर भरलेला नाही, त्यांची स्वतंत्र नोंद ठेवून संपर्क साधावा. बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र, मोकळ्या जागा व इतर मोठ्या थकबाकीदारांची स्वतंत्र यादी तयार करावी. ३० सप्टेंबरपूर्वी थकबाकीदारांना नोटिसा बजावून १ ऑक्टोबरपासून थेट जप्तीची कारवाई सुरू करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने आपापल्या भागातील कर वसुलीचे सूक्ष्म (Micro Level) नियोजन करून दैनंदिन आढावा घ्यावा.
चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२६ ते १० सप्टेंबर २०२६ पर्यंत शहरातून ५८४ कोटी ४९ लाख ४५ हजार २२८ रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे.
“३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मालमत्ता कर ऑनलाइन भरल्यास सामान्य करावर ४ टक्के सवलत देण्यात येत आहे. ही सवलत मिळवण्यासाठी आता शेवटचे २० दिवस शिल्लक आहेत. थकबाकीदारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता ऑनलाइन पद्धतीने कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा व महापालिकेला सहकार्य करावे.”— तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
