34
भोसरी एमआयडीसीत उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर कारवाईसाठी नगरसेवक तुषार सहाणे आक्रमक; पोलिसांना दिले कडक कारवाईचे निवेदन!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ११ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / भोसरी: भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ऋतिक वाईन्स आणि सी-सर्कल (C Circle) परिसरात उघड्यावर मद्यपान करणाऱ्या मद्यपींमुळे स्थानिक नागरिक, महिला आणि पादचाऱ्यांना रोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येची तत्काळ दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे धडाडीचे नगरसेवक तुषार सहाणे यांनी आज थेट एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार यांची भेट घेतली व त्यांना कडक कारवाईबाबतचे लेखी निवेदन दिले.
एमआयडीसी परिसरातील सार्वजनिक जागा, रस्ते आणि दुकानांच्या आडोशाला बसून मद्यपी उघड्यावर दारू पिऊन हुल्लडबाजी करतात. यामुळे परिसरातून जाणाऱ्या महिला, तरुणी आणि लहान मुलांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असून महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
नेहमीच जनसेवेसाठी आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांवर तत्परतेने धावून जाणारे नगरसेवक तुषार सहाणे यांनी याप्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. “एमआयडीसी परिसरात शांतता, सुरक्षितता आणि विशेषतः महिलांसाठी सुरक्षित व निर्भय वातावरण टिकवून ठेवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. या मद्यपींचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असा रोखठोक इशारा त्यांनी यावेळी दिला.
ऋतिक वाईन्स आणि सी-सर्कल परिसरात पोलिसांची मोबाईल गस्त आणि बीट मार्शलची गस्त तातडीने वाढवावी. सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणाऱ्या मद्यपींवर आणि हुल्लडबाजांवर तात्काळ कठोर कायदेशीर गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड करावी. नागरिक व महिलांना भीतीमुक्त वातावरणात वावरता यावे यासाठी आवश्यक ते सर्व प्रशासकीय पावले उचलावीत.
नगरसेवक तुषार सहाणे हे आपल्या प्रभागातील विकासकामांसोबतच नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न यावर नेहमीच आक्रमकपणे आवाज उठवत आले आहेत. सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन धडक मारणे आणि प्रश्नांची तड लावणे, ही त्यांची ओळख बनली आहे. त्यांच्या या तत्पर आणि आक्रमक कार्यपद्धतीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि विशेषतः महिला वर्गामध्ये त्यांच्याबद्दल आदराची व विश्वासाची भावना अधिक दृढ झाली आहे.
यावेळी निवेदन देताना नगरसेवक तुषार सहाणे यांच्यासोबत स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी देखील या निवेदनाची गंभीर दखल घेत लवकरात लवकर ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
