25
औद्योगिक क्षेत्रातील खंडणीखोरीविरुद्ध पिंपरी-चिंचवड पोलिसांचे ‘झिरो टॉलरन्स’; ५ कोटींची खंडणी मागून २५ लाख स्वीकारताना चार जणांना सापळा रचून अटक!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ११ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / भोसरी: पिंपरी-चिंचवड शहराच्या औद्योगिक पट्ट्यात उद्योजक, व्यावसायिक आणि कामगार आस्थापनांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या तसेच दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींविरुद्ध पिंपरी-चिंचवड पोलीस दलाने ‘शून्य सहनशीलता’ (Zero Tolerance) धोरण स्वीकारले आहे. याच धोरणांतर्गत कारवाई करत भोसरी एमआयडीसी परिसरातील एका नामांकित कंपनीच्या प्रतिनिधीला माहिती अधिकाराचा धाक दाखवून ५ कोटी रुपयांची खंडणी मागत २५ लाख रुपये स्वीकारणाऱ्या चार आरोपींना खंडणी विरोधी पथकाने अत्यंत चाणाक्षपणे सापळा रचून अटक केली आहे.
एमआयडीसी भोसरी परिसरातील एका खासगी कंपनीचे काम योग्य नसल्याचे सांगत आरोपींनी मागील सहा महिन्यांपासून कंपनीच्या प्रतिनिधींशी वारंवार संपर्क साधला होता. “महाराष्ट्रात धंदा करायचा असेल तर ५ कोटी रुपये द्यावे लागतील, नाहीतर कंपनीची वाट लावू आणि जीवे मारू,” अशी थेट धमकी आरोपींनी दिली होती.
कंपनीच्या तक्रारीची तातडीने व अत्यंत गांभीर्याने दखल घेत खंडणी विरोधी पथकाने सापळा रचला. या प्रकरणी एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ६१३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०८(३), ३०८(४), ३०८(५), ३(५) नुसार गुन्हा दाखल करून चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी १) राहुल प्रेमनारायण मिश्रा (वय ३८ वर्षे) , २) अल्ताफ उस्मान जानवेकर (वय ५३ वर्षे) , ३) रमेश भिमा मांजरेकर (वय ३९ वर्षे) , ४) सुनील राजेंद्र कानू (वय ३५ वर्षे)
आरोपी सुनील कानू याच्या ताब्यातील मारुती सुझुकी XL-6 (Maruti Suzuki XL-6) या वाहनातून सर्व आरोपी तक्रारदाराला भेटण्यासाठी आले होते. खंडणीच्या रकमेबाबत वाटाघाटी झाल्यानंतर आरोपी राहुल मिश्रा याने तक्रारदाराकडून २५ लाख रुपयांची रोख रक्कम काळ्या रंगाच्या बॅगसह स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी चौघांनाही रंगेहात पकडले.
पिंपरी-चिंचवड पोलीस दलाने स्पष्ट केले आहे की, औद्योगिक विकासाला अडथळा आणणारी किंवा व्यावसायिकांवर दबाव आणून गुन्हेगारी टोळ्यांच्या माध्यमातून खंडणी वसूल करणारी कोणतीही प्रवृत्ती सहन केली जाणार नाही. मुख्य सूत्रधारांसह मध्यस्थ आणि त्यांना मदत करणाऱ्या प्रत्येकावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
“उद्योजक व व्यावसायिकांनी कोणत्याही दबावाला किंवा धमकीला बळी न पडता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवून त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.”— रोहिदास पवार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), पिंपरी-चिंचवड.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह-पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, अंमलदार अभिमन्यू बनसोडे, सुनील कानगुडे, किशोर कांबळे, प्रदीप पोटे, किरण जाधव, चंद्रकांत जाधव, प्रदीप गोडांबे व दादाभाऊ साबळे यांच्या पथकाने केली.
खंडणी किंवा धमकीसंदर्भात तक्रार करण्यासाठी नागरिकांनी व उद्योजकांनी गुन्हे शाखेच्या ७५१७-७५१७-५९३ या हेल्पलाइन क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
