17
महापौर रवी लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवडचा शैक्षणिक-सामाजिक कायापालट; ५७ हजार विद्यार्थ्यांच्या सुदृढ भविष्यासाठी शालेय पोषण आहार व्यवस्था अधिक सक्षम!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ११ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांना सर्वोच्च प्राधान्य देत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली शहरात विकासाचा आणि जनकल्याणाचा नवा अध्याय लिहिला जात आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि ‘अन्नामृत फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यात आलेल्या शालेय पोषण आहाराच्या केंद्रीय स्वयंपाकगृहाचे आज अत्यंत उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या अद्ययावत सुविधेमुळे महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे ३०० शाळांमधील तब्बल ५७ हजार विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी शालेय पोषण आहार व्यवस्था अधिक सक्षम आणि सुरक्षित झाली आहे.
महापौर रवी लांडगे यांच्या तत्पर आणि संवेदनशील कार्यपद्धतीमुळे शहरात शिक्षण व आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत असून, त्यांच्याकडून पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा उत्तरोत्तर वाढू लागल्या आहेत.
उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना महापौर रवी लांडगे म्हणाले, “विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि शिक्षण यांचा परस्परांशी अतिशय जवळचा संबंध आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच स्वच्छ, सकस आणि पौष्टिक आहार मिळणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ५७ हजार विद्यार्थ्यांना नियमितपणे पोषण आहार उपलब्ध करून दिला जात असून, या व्यवस्थेमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि गुणवत्तेचा उच्च दर्जा कायम राखला जाईल. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी योग्य पोषण अत्यंत आवश्यक असून भविष्यातही विद्यार्थीकेंद्री उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल.”
या अद्ययावत केंद्रीय स्वयंपाकगृहासाठी आवश्यक आणि मोकळी जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक आमदार श्रीकांत भारतीय यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे व महापौर रवी लांडगे यांच्या पाठपुराव्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारासाठी आधुनिक व आंतरराष्ट्रीय दर्जाची यंत्रणा उभारण्यास मोठी मदत झाली आहे.
अन्नामृत फाउंडेशनच्या माध्यमातून पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचे निकष पाळण्यासाठी हे स्वयंपाकगृह अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अद्ययावत करण्यात आले आहे. अन्न शिजवण्यापासून ते ते विद्यार्थ्यांच्या ताटापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्यापर्यंतच्या संपूर्ण साखळीवर कडक नियंत्रण असणार आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांतील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यास या योजनेचा मोठा हातभार लागणार आहे.
या दिमाखदार सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, इस्कॉनचे आध्यात्मिक गुरु गौरांग प्रभू, आमदार श्रीकांत भारतीय, आमदार अमित गोरखे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, नगरसेविका सारिका मासुळकर यांच्यासह अन्नामृत फाउंडेशनचे पदाधिकारी, पालिका अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौरपदाची धुरा सांभाळल्यापासून रवी लांडगे यांनी शहराच्या पायाभूत सुविधांसोबतच शिक्षण, आरोग्य आणि गरीब विद्यार्थ्यांच्या कल्याणावर विशेष भर दिला आहे. प्रशासकीय कामांवर पकड निर्माण करत थेट मैदानात उतरून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची त्यांची हातोटी नागरिकांच्या पसंतीस उतरली आहे. ५७ हजार विद्यार्थ्यांच्या आहाराची चिंता वाहणारा हा प्रकल्प महापौर लांडगे यांच्या लोककल्याणकारी दृष्टिकोनाची साक्ष देत असून, त्यांच्या या धडाडीच्या कार्यपद्धतीमुळे पिंपरी-चिंचवडकरांच्या मनात त्यांच्याबद्दलचा विश्वास आणि आदराची भावना अधिकच दृढ झाली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

