news
Home पिंपरी चिंचवड ‘चालाल तर वाचाल’; चिंचवड येथील आरोग्य संवादात डॉक्टरांचा ज्येष्ठ नागरिकांना नियमित व्यायामाचा सल्ला!

‘चालाल तर वाचाल’; चिंचवड येथील आरोग्य संवादात डॉक्टरांचा ज्येष्ठ नागरिकांना नियमित व्यायामाचा सल्ला!

पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाचा उपक्रम; देशभक्तीपर गीते अन् 'संगीत रजनी'च्या सुरेल स्वरांनी सोहळा ठरला वैशिष्ट्यपूर्ण | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

ज्येष्ठ नागरिकांसाठी चिंचवडमध्ये ‘आरोग्य संवाद’ कार्यक्रमाचे शानदार आयोजन; पॅन अर्थो हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे विविध आजारांवर मार्गदर्शन!

 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी सुनील पोकरे, दि. १२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

चिंचवड / पिंपरी: पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघ व पॅन अर्थो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आरोग्य संवाद’ कार्यक्रमाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले. “सुधारलेले शरीर, आनंदी मन व सार्थ आयुष्य” या मध्यवर्ती संकल्पनेवर (थीम) आधारित असलेल्या या सोहळ्याला पिंपरी-चिंचवड परिसरातील जवळपास ५०० ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रसंगी पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषालीताई मरळ, सरचिटणीस ईश्वरलाल चौधरी, महासंघाचे इतर पदाधिकारी, तसेच पॅन अर्थो हॉस्पिटलचे डॉ. उमेश जाधव व त्यांची तज्ज्ञ डॉक्टरांची संपूर्ण टीम उपस्थित होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस ईश्वरलाल चौधरी यांनी केले.

कार्यक्रमात पॅन अर्थो हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने स्लाइड शोच्या माध्यमातून विविध आजारांवर सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. जोशी यांनी पॅन अर्थो हॉस्पिटलच्या वैद्यकीय सुविधांची माहिती दिली व पाठीच्या मणक्याच्या आजारांवर मार्गदर्शन केले. डॉ. सिद्धेश्वर यांनी मधुमेह (Diabetes) आणि त्यावरील प्रभावी उपचारांची माहिती दिली. डॉ. उमेश जाधव यांनी ज्येष्ठांमधील वाढती गुडघेदुखी आणि त्यावरील आधुनिक उपचारांवर प्रकाश टाकला. डॉ. प्रमोद पाटील यांनी ‘रोबोटिक स्पाइन ट्रीटमेंट’ (Robotic Spine Treatment) या अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली. डॉ. ज्योत्स्ना पाटील यांनी मधुमेह व रक्तदाब (BP) नियंत्रणावर मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, “ज्येष्ठ नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःहून कोणत्याही गोळ्या किंवा औषधे बंद करू नयेत. दररोज नियमित चालण्याचा व्यायाम करावा — ‘चालाल तर वाचाल’.”

महासंघाच्या अध्यक्षा वृषालीताई मरळ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहरात महासंघांतर्गत एकूण १७६ ज्येष्ठ नागरिक संघ कार्यरत असून जवळपास २० हजार सदस्य आहेत. शहरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन सोहळा पार पडला.
भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी ‘हीच आमुची प्रार्थना’ आणि ‘अन् हेच आमुचे मागणे’ या गीतांसह शहाजी कांबळे, मंजुश्री, छाया निकुंब, श्रद्धा कांबळे आणि दामोदर धनवारे (विशेष लष्करी पोशाखात ‘संदेशे आते हैं’) यांनी देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमादरम्यान दोन्ही संस्थांकडून परस्परांच्या पदाधिकाऱ्यांचा व डॉक्टरांच्या टीमचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच उत्तरार्धात ‘संगीत रजनी’ अंतर्गत सदाबहार गीतांचा सुरेल कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन महासंघाचे कार्याध्यक्ष विजय शिणकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन कोषाध्यक्ष हेमचंद्र जावळे यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!