news
Home पिंपरी चिंचवड ‘अतिक्रमणे अन् अनधिकृत बांधकामे सहन केली जाणार नाहीत’; पिंपरी-चिंचवड पालिकेकडून चिखली, भोसरी, वाकड अन् पिंपरीत कारवाई!

‘अतिक्रमणे अन् अनधिकृत बांधकामे सहन केली जाणार नाहीत’; पिंपरी-चिंचवड पालिकेकडून चिखली, भोसरी, वाकड अन् पिंपरीत कारवाई!

मोठा पोलीस ताफा अन् MSF जवानांच्या उपस्थितीत निष्कासन; नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा आयुक्त सूर्यवंशी यांचा इशारा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर महापालिकेचा ‘हातोडा’; तब्बल ८३ हजार चौरस फुटांचे अतिक्रमण भुईसपाट!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे आणि रस्ते-पदपाथांवरील अतिक्रमणांविरोधात महापालिका प्रशासनाने धडक मोहीम उघडली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या कडक आदेशान्वये, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आणि अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व १० क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत आर.सी.सी. बांधकामे, पत्राशेड, नव्याने सुरू असलेली बांधकामे आणि पदपथांवरील टपऱ्या-हातगाड्या असे एकत्रित ८३ हजार ९९ चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमण निष्कासित करण्यात आले.

‘फ’ क्षेत्रीय कार्यालय (सर्वाधिक कारवाई) मोरे वस्ती (चिखली), तळवडे व नेवाळे वस्ती परिसरात तब्बल १९,४०० चौरस फूट क्षेत्रावरील बांधकामे भुईसपाट करण्यात आली. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय राजवाडे नगर, गोकुळवाडी, पवनानगर, स्वप्ननगरी, काळेवाडी, डोंगरे कॉर्नर, मंगल नगर व थेरगाव येथे १३,०३५ चौरस फूट क्षेत्रावर कारवाई. ‘क’ क्षेत्रीय कार्यालय चिखली, कुदळवाडी, शिवरोड, रवी रंजन वजन काटा आणि डी-मार्ट शेजारी (चिंचवड) १२,७२३ चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमण काढले. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय शगुन चौक, पिंपरी मार्केट, एम्पायर ब्रिजखालील परिसर व वाल्हेकरवाडी येथे १०,५३८ चौरस फूट क्षेत्रावरील गाळे व टपऱ्या हटवल्या. ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय भोसरी व मोशी परिसरात ७,९६५ चौरस फूट क्षेत्रावर बुलडोझर फिरवला. ‘ज’ क्षेत्रीय कार्यालय वाल्हेकरवाडी, दत्त मंदिर रोड (वाकड), पिंपळे निलख व किवळे परिसरात ६,०२८ चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमण काढले. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय विविध भागांत ५,४०० चौरस फूट क्षेत्रावर कारवाई. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय साईनगर (निगडी) परिसरात ३,४९८ चौरस फूट क्षेत्र मोकळे केले. ‘ल’ क्षेत्रीय कार्यालय भोसरी, इंद्रायणी नगर, संत तुकाराम नगर व पिंपरी येथे ३,४२६ चौरस फूट क्षेत्रावर कारवाई. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय जुनी सांगवी परिसरात १,०८६ चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमण निष्कासित केले.

 

सर्व १० क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली पार पडलेल्या या कारवाईत उपअभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, बीट निरीक्षक, २१८ एमएसएफ (MSF) जवान, पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि पालिकेच्या मजुरांनी सहभाग घेतला.

“पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक जागा, रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवणे आणि अनधिकृत बांधकामांना अटकाव करणे ही महापालिकेची सातत्यपूर्ण जबाबदारी आहे. नागरिकांनी अनधिकृत बांधकामे अथवा अतिक्रमणे करू नयेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. शहराचे नियोजनबद्ध व शिस्तबद्ध स्वरूप कायम ठेवण्यासाठी क्षेत्रनिहाय ही मोहीम अशीच सुरु राहील.”
डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!