news
Home पिंपरी चिंचवड ‘नदीत निर्माल्य न टाकता महापालिकेच्या कलशात जमा करा’; उपमहापौर शर्मिला बाबर यांचे शहरवासीयांना आवाहन!

‘नदीत निर्माल्य न टाकता महापालिकेच्या कलशात जमा करा’; उपमहापौर शर्मिला बाबर यांचे शहरवासीयांना आवाहन!

पिंपरी-चिंचवड महापालिका व महिला बचत गटांचा स्तुत्य उपक्रम; दापोडीत निर्माल्यापासून तयार होणार सुगंधी धूप व अगरबत्ती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्माल्यापासून सुगंधी अगरबत्ती निर्मिती; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडून प्रकल्पाची पाहणी!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी / दापोडी: गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे योग्य आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापन व्हावे, या उद्देशाने दापोडी येथे उभारण्यात आलेल्या निर्माल्यापासून सुगंधी धूप व अगरबत्ती निर्मिती प्रकल्पाला उपमहापौर शर्मिला बाबर यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी संपूर्ण प्रक्रिया जाणून घेतली तसेच प्रकल्पात कार्यरत असलेल्या महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या कामकाजाची व अडचणींची माहिती घेतली.
या पाहणी प्रसंगी सहाय्यक आरोग्य निरीक्षक राजेश भाट, अंकुश झिटे, मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, आरोग्य निरीक्षक ओंकार शिवरकर, प्रभारी आरोग्य निरीक्षक उमेश जाधव, समाज विकास विभागाच्या समूह संघटिका वैशाली लगडे, ‘योजक’ संस्थेच्या सिनिअर मॅनेजर सेजल जोशी यांच्यासह प्रकल्पातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध धार्मिक स्थळे व परिसरा Mandir/Ghats मधून दररोज सुमारे ५०० किलो निर्माल्य संकलित केले जाते. या निर्माल्यावर प्रक्रिया करून उच्च दर्जाची सुगंधी धूप आणि अगरबत्ती तयार केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि चार महिला बचत गटांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. यामुळे निर्माल्याची योग्य विल्हेवाट लागून पर्यावरण संवर्धन तर होत आहेच, शिवाय महिलांना शाश्वत रोजगाराची संधी उपलब्ध होऊन त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळत आहे.

“गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात निर्माल्य निर्माण होते. हे निर्माल्य नदी किंवा नाल्यांमध्ये टाकल्यास पाण्याचे प्रदूषण होते. त्यामुळे नागरिकांनी निर्माल्य जलस्रोतांमध्ये न टाकता महापालिकेच्या निर्माल्य कलशांमध्ये जमा करावे. या निर्माल्यापासून सुगंधी अगरबत्ती तयार करून पर्यावरण संवर्धन व महिलांना रोजगार दिला जात आहे. या उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा.”
शर्मिला बाबर, उपमहापौर, पिंपरी-चिंचवड महापालिका.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!