news
Home पिंपरी चिंचवड ‘डिजिटल तंत्रज्ञानामुळे प्रशासनात पारदर्शकता अन् नागरिकांची वेळेची बचत’; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन!

‘डिजिटल तंत्रज्ञानामुळे प्रशासनात पारदर्शकता अन् नागरिकांची वेळेची बचत’; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन!

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा डिजिटल उपक्रम यशस्वी; पूर्वऑनलाइन नोंदणी करूनच महापालिकेत येण्याचे आयुक्त सूर्यवंशी यांचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘स्वागतम ई-प्रवेश’ प्रणालीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद; ५१ हजारहून अधिक अपॉइंटमेंट्सची नोंद!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड : महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी, प्रवेश प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘स्वागतम ई-प्रवेश’ प्रणालीला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. १ मे २०२६ ते ७ सप्टेंबर २०२६ या अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल ५१ हजार १५९ अपॉइंटमेंट्सची नोंद झाली आहे. यापैकी ३९ हजार ४४३ नागरिकांनी आगाऊ (Advance) ऑनलाइन नोंदणी करून पालिकेत प्रवेश केला आहे, तर १४ हजार ७२३ नागरिकांनी स्वतःची कायमस्वरूपी लॉगिन खाती तयार केली आहेत.

‘स्वागतम ई-प्रवेश’ प्रणालीद्वारे नागरिकांनी विविध प्रशासकीय विभागांना भेटी दिल्या. यामध्ये सर्वाधिक प्रतिसाद मिळालेले पहिले १० विभाग पुढीलप्रमाणे आहेत. बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण ९,३६१ नागरिक , नगररचना विभाग (Town Planning) ४,३११ नागरिक , स्थापत्य विभाग ३,७९२ नागरिक , वैद्यकीय विभाग २,४०३ नागरिक , महापौर कार्यालय २,३०६ नागरिक , आरोग्य विभाग १,९२० नागरिक , पर्यावरण अभियांत्रिकी विभाग १,५७१ नागरिक , पाणीपुरवठा व जलनिस्सारण विभाग १,४९१ नागरिक , आयुक्त कार्यालय १,३३० नागरिक , लेखा विभाग (Accounts) १,२४९ नागरिक.

 

महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील ‘मुख्य इमारत प्रवेश प्रणाली’ या लिंकद्वारे नागरिक घरबसल्या नोंदणी करू शकतात. प्रथमच वापरणाऱ्या नागरिकांनी आपले पूर्ण नाव, पत्ता, फोटो, मोबाईल क्रमांक आणि अधिकृत ओळखपत्राचा तपशील भरून खाते तयार करावे.  नोंदणी आणि पालिकेच्या मुख्य इमारतीत प्रवेशाच्या वेळी मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीचा (OTP) सुरक्षिततेसाठी वापर केला जातो. नागरिक शनिवार, रविवार व सुट्ट्या वगळून पुढील ७ दिवसांतील सोयीस्कर तारीख आणि कमाल ३ विभाग निवडून अपॉइंटमेंट घेऊ शकतात.  नोंदणी पूर्ण झाल्यावर मिळणारा क्यूआर कोड (QR Code) प्रवेशद्वारावर दाखवून स्कॅन केल्यावर नागरिकांना थेट व जलद प्रवेश मिळतो.

या प्रणालीमुळे नागरिकांना रांगेत उभे न राहता पूर्वकल्पित वेळेत कामासाठी येता येत आहे, ज्यामुळे प्रशासकीय कामकाजात शिस्त व पारदर्शकता निर्माण झाली आहे.
“महापालिकेच्या सेवा नागरिककेंद्रित, सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. ‘स्वागतम ई-प्रवेश’ प्रणालीमुळे नागरिकांचा अमूल्य वेळ वाचत असून प्रवेश व्यवस्थेत शिस्त व सुरक्षितता निर्माण झाली आहे. भविष्यात अशा डिजिटल सुविधांचा आणखी विस्तार केला जाईल. नागरिकांनी महापालिकेत येण्यापूर्वी आगाऊ नोंदणी करावी.”
डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!